बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या आणि मतदार याद्यांचे मॅपिंग या विषयांवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रशासकीय आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. जिल्ह्याची पाण्याची गरज पाहता महाराष्ट्र सरकारकडे कृष्णा नदीतून दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.
मतदार याद्यांच्या मॅपिंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. पुढील रविवारपर्यंत प्रलंबित कामे संपवून ७५ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कँटोन्मेंट बोर्ड आणि वनविभागाच्या वसाहतींसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातही प्रमुख चौकांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.
या बैठकीला पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन आणि विविध तालुक्यांचे तहसीलदार उपस्थित होते.





