belgaum

‘त्या’ सफाई कर्मचारी महिलेच्या कुटुंबीयांना आमदारांचे आर्थिक सहाय्य

0
1060
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका महिला पौरकार्मिकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याबरोबरच मयत महिलेच्या जागी तिच्या मुलाला पौरकार्मीक म्हणून नेमण्याची व्यवस्था करण्याद्वारे पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले.

आरपीडी क्रॉस, टिळकवाडी येथे आज शनिवारी सकाळी रस्ते अपघातात स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिला पौरकार्मिकाचा मृत्यू झाला. ही घटना शहापूरचे नगरसेवक रवी साळुंके यांना कळताच त्यांनी लागलीच आमदार असिफ सेठ यांना त्याबाबतची माहिती दिली. दरम्यान पोलीस पंचनाम्यानंतर मयत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे नेण्यात आला होता.

अपघाताबद्दल माहिती मिळाल्यानंतर माणुसकी जपणाऱ्या आमदार सेठ यांनी लगोलग सिव्हिल हॉस्पिटलच्या उत्तरीय तपासणी (मर्चुरी) विभागाच्या ठिकाणी जाऊन तेथे उपस्थित असलेल्या मयताच्या गरीब कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच त्यांना वैयक्तिक 50 हजार रुपयांची मदत देऊ केली. एवढे करून न थांबता आमदार सेठ यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या जागी तिच्या मुलाला पौरकार्मिक म्हणून येत्या 8 दिवसात भरती करून घेण्याची सूचना केली.

 belgaum

मयत महिला ही पौरकार्मीक म्हणून वर्षभरापूर्वी सेवेत कायम झाली होती आणि आज सेवेत असतानाच तिचा मृत्यू झाल्यामुळे नियमानुसार आईच्या जागेवर मुलाची नोकरी निश्चित झाली आहे. आमदारांची उपरोक्त माणुसकीची कृती दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मयत पौरकार्मिक महिलेच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देऊन गेली.

याप्रसंगी आमदार असिफ सेठ यांच्या समवेत नगरसेवक रवी साळुंके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.