बेळगाव लाईव्ह :आमच्या सुरण्णावर हॉस्पिटलने प्रगत अस्थिरोग उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून बेळगावमध्ये प्रथमच रोबोटिक-सहाय्यित सांधेरोपण (रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक होत असल्यामुळे रुग्णांच्या पुनर्वसनाचा कालावधी कमी होण्यास मदत होते, अशी माहिती बेळगावच्या सुरण्णावर हॉस्पिटलचे प्रमुख डाॅ. जगदीश सुरण्णावर यांनी दिली.
बेळगावमध्ये आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यशस्वी रोबोटिक-सहाय्यित सांधेरोपण शस्त्रक्रियेमुळे सुरण्णावर हॉस्पिटल उत्तर कर्नाटकातील रोबोटिक मदतीने अस्थिरोग शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणाऱ्या अग्रगण्य केंद्रांपैकी एक ठरले आहे. त्यामुळे आता बेळगाव आणि परिसरातील रुग्णांना प्रगत सांधे प्रत्यारोपण किंवा सांधे बदलण्याच्या उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठ्या महानगरांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.
याशिवाय आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे सुरण्णावर हॉस्पिटलने उत्तर बेळगाव जिल्हा कर्नाटक येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत विविध देशातील अस्थिरोग तज्ञ बेळगाव येथे येऊन जॉईंट रिप्लेसमेंट व ट्रॉमा सर्जरीच्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती देऊन सामान्यता भारतीय शल्यचिकित्सक प्रगत अस्थिरोग शिक्षणासाठी युरोपमध्ये जातात. मात्र आता युरोपमधील शल्यचिकित्सक बेळगावमध्ये येऊन प्रशिक्षण घेत आहेत ही भारत, कर्नाटक आणि बेळगावसाठी अभिमानाची बाब आहे, असे डाॅ. सुरण्णावर यांनी पुढे सांगितले.
प्रगत नव्हे तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सुरण्णावर हॉस्पिटलने आत्तापर्यंत सुमारे 10 दुर्मिळ व गुंतागुंतीच्या अस्थिरोग शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. ज्यापैकी बहुतांश शस्त्रक्रिया उत्तर कर्नाटकात प्रथमच करण्यात आले आहेत. आता रोबोटिक-सहाय्यित सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी वैद्यकीय तज्ञांच्या समर्पणाचे प्रतीक असून उत्तर कर्नाटकातील रुग्णांना जागतिक दर्जाची अस्थिरोग सेवा उपलब्ध करून देण्याचे सुरण्णावर हॉस्पिटलचे ध्येय यातून अधोरेखित होते. यापुढे देखील आमचे हॉस्पिटल अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल शस्त्रक्रिया सेवा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून रुग्णसेवा व वैद्यकीय शिक्षण अधिक बळकट करण्यासाठी कार्यरत राहणार आहे, असे डाॅ. जगदीश सुरण्णावर यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस सुरणावर हॉस्पिटलचे अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.





