belgaum

पाण्यासाठी रयत गल्लीचा मनपावर मोर्चा,

0
498
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वडगाव परिसरातील रयत गल्ली येथील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी बेळगाव महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले. पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या नागरिकांनी महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगाही केला.

मोर्चा महापालिका आवारात पोहोचताच काही आंदोलकांनी गेट उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलिस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी आंदोलकांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली. परिसरात सुरू असलेल्या खुदाईच्या कामामुळे विहिरीचे पाणी ड्रेनेजमध्ये मिसळल्याचा तसेच नळालाही दूषित पाणी येत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

 belgaum

आंदोलनावेळी स्थानिक नेते राजू मर्वे यांनी महापालिका आयुक्तांना कडक इशारा देत पाण्याची समस्या तातडीने सोडवली नाही तर पुढील काळात बैलगाड्या आणि जनावरे घेऊन महापालिका कार्यालयात घुसून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

रयत गल्ली येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकाला या समस्या बाबत सांगितले असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे आणि थातूरमातूर उत्तर देत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी स्वतः रयत गल्ली परिसराला भेट देऊन नागरिकांची समस्या जाणून घेण्याचे आश्वासन दिले. आयुक्तांच्या या आश्वासनानंतर आंदोलकांनी मोर्चा मागे घेतला. मात्र, लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.