बेळगाव लाईव्ह :रमजान ईदनिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर आज शनिवारी सकाळी शेकडो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने पार पडला. आमदार आसिफ राजू सेठ यांनी नमाजानंतर उपस्थित सर्वांना तसेच शहरवासीयांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
रमजानच्या महिनाभर चालणाऱ्या उपवासाच्या (रोझा) समाप्तीनंतर बेळगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी आज शनिवारी रमजान ईद (ईद-उल-फित्र) हा पवित्र सण मोठ्या उत्साहात श्रद्धेने साजरा केला. आनंद, बंधुत्व आणि दानाचा सण असलेल्या ‘मीठी ईद’ अर्थात रमजान ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन सामूहिक नमाज अदा केली.
या धार्मिक कार्यक्रमातील बालगोपाळांचा सहभाग लक्षवेधून घेत होता. आमदार असिफ (राजू) सेठ यांनी या पवित्र वातावरणात सहभागी होऊन सर्वांना अभिनंदन आणि शुभकामना व्यक्त केल्या. हा कार्यक्रम श्रद्धापूर्वक शांतीपूर्ण वातावरणात पार पडल्यामुळे सामाजिक सौहार्द वाढला. सामूहिक नमाज पठणानंतर उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.
यावेळी आमदार सेठ यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधून त्यांच्या भावनांचा आदर केला. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार सेठ यांनी समस्त शहरवासीयांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करताना शहरवासियांनी शांती व सौहार्दपूर्ण वातावरणात प्रत्येक सण साजरा करावा आणि देशाला पुढे न्यावे असे आवाहन केले.
युवा नेते अमान सेठ यांनी रमजान ईद सण साजरा करण्यामध्ये मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवांचाही सहभाग असतो. यावेळीही तेच घडत आहे. आज देशात असे चित्र आहे की आम्ही सर्वजण एकत्र येऊन पुढे जात आहोत.
आम्ही सर्वजण एकमेकांचे सण साजरे करतो असे सांगून शहरवासीयांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्याबरोबरच शांती सौहार्द आणि प्रेमाचा संदेश अमान यांनी दिला. रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानाप्रमाणेच बेळगाव शहर परिसरातील दर्गा, मशिदी यासारख्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन सामूहिक विशेष नमाज अदा केला.





