belgaum

बेळगावच्या सिटीज प्रकल्पात भाजपमुळे ६० कोटींची कपात : राजकुमार टोपण्णावर

0
398
Raju topannavar
Raju topannavar
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘सिटीज २.०’ प्रकल्प भाजपशासित महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे संकटात सापडला आहे. प्रकल्पाचा मूळ निधी १३५ कोटींवरून थेट ७५ कोटींवर आणण्याची नामुष्की ओढवली असून, याला केवळ सत्ताधाऱ्यांची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपण्णवर यांनी केला आहे.

बेळगाव शहरासाठी नियोजित असलेला १३५ कोटींचा सिटीज २.० प्रकल्प आता ७५ कोटींवर मर्यादित झाला असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला २० टक्के हिस्सा देण्याची जबाबदारी टाळली आहे. यामुळे प्रकल्पाचा आकार घटला असून शहरातील अनेक महत्त्वाचे विकास घटक कमी होतील, अशी भीती राजकुमार टोपण्णवर यांनी व्यक्त केली.

एकीकडे विकासकामांचा निधी कमी होत असताना दुसरीकडे महानगरपालिकेने प्रामाणिक करदात्यांवर मालमत्ता कराचा बोजा वाढवला आहे. मात्र, जे नागरिक कर चुकवत आहेत त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही प्रभावी मोहीम नाही. तसेच राज्य सरकारकडे या प्रकल्पासाठी कोणताही पाठपुरावा करण्यात आला नसल्याची टीका राजकुमार टोपण्णवर यांनी केली.

 belgaum

या प्रकल्पाबाबत नगरसेवकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला संमतीपत्र देताना नगरसेवकांना सिटीज २.० प्रकल्पाची पूर्ण माहिती होती का, असा सवाल त्यांनी केला.

या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली, यावरून प्रशासनातील गंभीर दुर्लक्ष स्पष्ट होत आहे. बेळगावच्या नागरिकांनी आता स्थानिक निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर आधारित निर्णय घ्यावा, असे आवाहन राजकुमार टोपण्णवर यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.