बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वळीव पावसाने सातत्य राखले आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारांच्या झालेल्या या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना जाणवणाऱ्या असह्य उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसरात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
सध्या गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांची काही काळ मोठी धांदल उडाली.
बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पावसासोबतच गारांचा वर्षाव झाल्याने रस्त्यावर गारांचे थर साचले होते. हे दृश्य पाहण्यासाठी आणि गारा वेचण्यासाठी लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती.वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या बेळगावकरांना या पावसामुळे मोठा सुखद अनुभव मिळाला आहे.
हा वळीव पाऊस खरीप पूर्व मशागतीच्या कामांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जात आहे. आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि जमिनीच्या मशागतीसाठी हा पाऊस शेतीला संजीवनी देणारा ठरणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, दुसरीकडे गारांच्या वर्षावामुळे आंबा आणि इतर फळबागायतदारांच्या चिंतेत भर पडली असून फळांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळी कडक ऊन आणि ढगाळ वातावरण राहिल्यानंतर दुपारी पावसाने हजेरी लावली. यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले असले तरी वातावरणातील बदलामुळेसर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.





