बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलीस दलाने आपल्या कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय देत चोरीला गेलेला तब्बल ६ कोटी ३६ लाख ९३ हजार ७४३ रुपयांचा मुद्देमाल एकाच वेळी ‘प्रॉपर्टी परेड’च्या माध्यमातून मूळ मालकांना परत केला. पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यामुळे वर्षभरातील अनेक गुंतागुंतीच्या चोरीच्या प्रकरणांचा निकाल लागला असून, नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधानाची मोहोर उमटवली आहे.
वर्ष २०२५ मध्ये शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी अहोरात्र कष्ट उपसले.
या शोधमोहिमेत २ कोटी ३६ लाख रुपये किमतीचे सुमारे २ किलो ३३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४ कोटी रुपये किमतीची ८५ वाहने, ज्यात जड ट्रक, कार आणि दुचाकींचा समावेश आहे, असा अवाढव्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच तांत्रिक तपासाद्वारे १४० मोबाईल संचही शोधून काढण्यात आले.

पोलीस दलाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून आंतरराज्य टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आणि हा सर्व मुद्देमाल जप्त केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा ऐवज खऱ्या वारसांना परत करणे हे आमचे कर्तव्य असून, त्यातून पोलिसांप्रती विश्वास वाढतो, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
यावेळी आपले चोरीला गेलेले दागिने आणि वाहने पाहून अनेक नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज तपासाबद्दल आणि कष्टाची कमाई परत मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शहापूर, खडेबाजार, टिळकवाडी आणि इतर सर्वच पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांचा यावेळी गौरव करण्यात आला.





