बेळगाव लाईव्ह :
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जातीय समीकरण साधत नेकार समाजाला महापौरपद आणि लिंगायत समाजाला उपमहापौरपद देण्याचा ‘ट्रम्प कार्ड’ भाजप नेत्यांनी खेळल्याचे दिसून येत आहे.
भाजपकडून महापौरपदासाठी प्रीती कामकर तर उपमहापौरपदासाठी हनुमंत कोंगाळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. तर काँग्रेसकडून महापौरपदासाठी खर्शीद मुल्ला आणि उपमहापौरपदासाठी मोदिनसाब मतवाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आज दुपारी १ वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून हात वर करून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिकेत एकूण ५८ सदस्य असून भाजपकडे ३८ सदस्यांसह स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेस आणि अपक्ष मिळून २० सदस्यांचे बळ आहे.

या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता उरली असल्याचे बोलले जात आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाला महापौरपद तर बेळगाव उत्तर मतदारसंघाला उपमहापौरपद देण्यात आले आहे.
या जातीय समीकरणाच्या राजकीय गणितात माजी आमदार अनिल बेनके यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.
एकूण मतबँक लक्षात घेऊन महापौर आणि उपमहापौर पदासाठी केलेली राजकीय रणनीती स्पष्टपणे दिसून येत आहे.




