बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या २४ व्या महापौरपदी कुंती नगर टीचर्स कॉलनी खासबागच्या नगरसेविका प्रीती कामकर, तर सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाळी उपमहापौर पदी विराजमान झाले आहेत.
बुधवारी महापालिका सभागृहात महापौर निवडणूक प्रक्रिया पार पडली.
बेळगाव महानगरपालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसने उमेदवार उभे करून दिलेले आव्हान मोडीत काढत भाजपने पुन्हा एकदा महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत भाजपच्या प्रीती कामकर यांची महापौरपदी, तर हनुमंत कोंगाळी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
प्रादेशिक आयुक्त जानकी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत भाजपने आपले संख्याबळ स्पष्टपणे सिद्ध केले. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३९ मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार खुर्शिदा मुल्ला (महापौर पद) आणि मोदिनसाब मत्तेवाले (उपमहापौर पद) यांना केवळ २० मतांवर समाधान मानावे लागले. भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते, मात्र काँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवार रिंगणात उतरवल्याने प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.
यावेळच्या निवडीत भाजपने प्रादेशिक आणि भाषिक समीकरणे अत्यंत चतुराईने हाताळली आहेत. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर निवडून आलेले प्रतिनिधी कन्नड भाषिक आहेत. बेळगावमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहता, भाजपने कन्नड कार्ड खेळल्याचे बोलले जात असून, विविध कन्नड संघटनांनी या निवडीचे स्वागत केले आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या महत्त्वाच्या घडामोडीत भाजपचे खासदार आणि विधान परिषद सदस्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

तरीही, अंतर्गत मतभेद बाजूला सारून भाजपने एकजुटीने दोन्ही जागा जिंकत महापालिकेवरील आपली पकड कायम राखली आहे. नवनियुक्त महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांच्यावर आता शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे.
.




