बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला बेळगावच्या विशेष पोक्सो न्यायालयाने ३० वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून पीडितेल्या न्याय मिळाला आहे.
धारवाड जिल्ह्यातील आळनावर तालुक्यातील डोरी बेणची येथील संजय विठ्ठल बैलोर या ३६ वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले आणि विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार पाशवी अत्याचार केले होते.
या प्रकरणाचा तपास खानापूरचे पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी यांनी पूर्ण करून बेळगावच्या विशेष जलदगती पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोजक एल. व्ही. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला. एकूण १० साक्षीदार, ८८ कागदोपत्री पुरावे आणि ७ जप्त वस्तूंच्या आधारावर आरोपीवरील दोष सिद्ध झाले.
न्यायालयाने आरोपी संजय बैलोर याला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत ३० वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त २ वर्षांच्या शिक्षेचे आदेशही दिले आहेत.
तसेच, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून पीडित मुलीला ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आणि ही रक्कम ५ वर्षांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याची माहिती एल. व्ही. पाटील यांनी दिली.





