बेळगाव लाईव्ह : स्वतः सोबत प्राणघातक धारदार शस्त्र बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या एकाला इसमाला माळमारुती पोलिसांनी काल अटक करण्याबरोबरच त्याच्या जवळील लोखंडी तलवार जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव गंगाराम लक्ष्मण कुळ्ळन्नूवर (वय 35, रा. ज्योतिर्लिंग गल्ली कणबर्गी, बेळगाव) असे आहे. अलीकडे बेळगाव शहरात वाढलेल्या धारदार शस्त्राने भोसकाभोसकीच्या प्रकारांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची अँटिस्टॅबींग पथके स्थापन करण्यात आली आहे.
या पथकांकडून संशयतांची झडती घेऊन त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करून गुन्हा नोंदवला जात आहे. त्यानुसार माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक काल गस्तीवर होते. त्यावेळी ज्योतिर्लिंग गल्ली कणबर्गी येथे संशयावरून त्यांनी गंगाराम याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ सापडलेली धारदार लोखंडी तलवार पोलिसांनी जप्त केली.
दहशत निर्माण करण्याबरोबरच गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने गंगाराम याने स्वतःसोबत प्राणघातक तलवार बाळगल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.





