बेळगाव लाईव्ह :आठवड्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करून देखील बेळगाव शहरात लावलेले इराणचे सर्वोच्च नेते खमेनेई याचे पोस्टर्स अद्याप हटवण्यात न आल्यामुळे आज आम्ही शहरातील कोल्हापूर सर्कल येथे भारताचे पंतप्रधान आणि इस्रायलचे पंतप्रधान या उभयतांचे पोस्टर उभारणार आहोत, अशी माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिली.
बेळगाव सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव शहरांमध्ये लावण्यात आलेले इराणचे नेते खमेनेई याच्या पोस्टर्सबद्दल आठवड्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून देखील खमेनेईची पोस्टर्स, बॅनर्स व कटआउट्स काढण्याची विनंती केली होती. खमेनेई याचे पोस्टर्स, बॅनर्स लावणे हे देशद्रोही कृती असून ते आम्ही कदापी स्वीकारणार नाही, असे आम्ही निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते.
मात्र अद्यापपर्यंत संबंधित पोस्टर्स, बॅनर्स व कटआउट काढण्यात आलेले नाहीत. सरकारची ही कृती मुसलमानांच्या मानसिकतेला आणखी प्रोत्साहित करणारी आहे. खरंतर न घाबरता सरकार प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. या खेरीज बेळगाव कुठे आणि इराण कुठे? दोहोंचा काहीही संबंध नाही. तसेच इराण हा दहशतवादाला पाठिंबा देणारा देश आहे.
भारतातील 370 कलम रद्द झाल्यानंतर त्याला खमेनेई याने विरोध केला होता. थोडक्यात खमेनेई हा भारत विरोधी, हिंदू विरोधी होता. मात्र तरीही त्याच्या पोस्टर्स बॅनरच्या बाबतीत कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आम्ही आज शहरातील कोल्हापूर सर्कल येथे भारत -इस्त्राईल मैत्रीचे प्रतीक म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे पोस्टर उभारणार आहोत.
यानंतरही खमेनेई याच्या पोस्टर बॅनर्सच्या बाबतीत कारवाई झाली नाही तर श्रीराम सेनेकडून आज ना उद्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजल खान वधाचे पोस्टर्स देखील शहरात लावले जातील, असे श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी शेवटी स्पष्ट केले.





