बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत महाराष्ट्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली.
गोकाक मधील श्रीनगर भागातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून पैसे चारपट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीला पकडले. यामध्ये परशुराम भीमशी बडकटी, इमरान बाबाजान जुनेदी, जयश्री बाबू कांबळे, मनीषा राजू गायकवाड, उज्ज्वला तुळशीराम बिलाने आणि पोलीस दलातील कर्मचारी अनंत प्रकाश नरवाडे व दिलदार रब्बानी शेख यांचा समावेश आहे. पांढऱ्या कागदाला काळा रंग लावून तेच खरे चलन असल्याचे भासवून ही टोळी लोकांची लूट करत असे, असे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगोंडा बसरगी, डीवायएसपी रवी नाईकडी आणि सीपीआय सुरेशबाबू आर.बी. यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली.

गोकाक शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण मोहिते आणि त्यांच्या पथकाने आरोपींकडून नोटा छापण्याचे मशिन, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केले असून पुढील तपास पीएसआय निखिल कांबळे करत आहेत.
या आंतरराज्य टोळीवर गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व सात आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. फसवणुकीच्या या धंद्यात स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने खळबळ माजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.





