बेळगाव लाईव्ह:कर्नाटक राज्यातील दहावीच्या वार्षिक परीक्षेला १८ मार्च २०२६ पासून प्रारंभ होत असताना बेळगाव जिल्ह्याचा निकाल अधिक गुणवत्तापूर्ण लागावा यासाठी बेळगाव शहर उत्तर विभागाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविला. लोकप्रतिनिधी थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अभ्यासाची पाहणी करत असल्याने या उपक्रमाची शहरात व्यापक चर्चा रंगली आहे.
काल संध्याकाळी जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, तसेच सरकारी सरदार्स हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. हादिमनी यांच्या समवेत आमदार राजू सेठ यांनी सरकारी सरदार्स हायस्कूलच्या काही विद्यार्थ्यांच्या घरी अचानक भेट देत त्यांच्या अभ्यासाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम विद्यार्थी नंदकुमार गुग्गुरी यांच्या घरी भेट देण्यात आली. त्यांच्या वडिलांचा बेळगाव महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात रोजंदारीवर रोजगार असूनही मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट पाहून आमदारांनी पालकांचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्याला अधिक गुण मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले.
त्यानंतर आंबेडकर नगर परिसरातील विद्यार्थिनी स्नेहा चिकनगौडर हिच्या घरी भेट देण्यात आली. घरापर्यंत वाहन पोहोचू शकत नसल्याने आमदार राजू शेठ व अधिकारी पायी चालत तिच्या घरी पोहोचले. ड्रायव्हर असलेल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही स्नेहाची शिक्षणातील जिद्द पाहून उपस्थितांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या पालकांशी संवाद साधत मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर विश्वेश्वरय्या नगर येथील विद्यार्थिनी अक्षरा कोडली हिच्या घरी भेट देण्यात आली. अक्षराची आई बेळगाव ट्रेझरी कार्यालयात अधिकारी असूनही आपल्या मुलीला सरकारी शाळेत शिक्षण दिल्याबद्दल आमदारांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. कामगार चळवळीतील कार्यकर्ते असलेल्या तिच्या वडिलांशीही चर्चा करण्यात आली. अक्षराच्या अभ्यासाचे कौतुक करत तिला उत्कृष्ट गुण मिळविण्याचा आत्मविश्वास देण्यात आला.
यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गोष्टी सांगत नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व पटवून दिले.

या भेटीदरम्यान सरकारी सरदार्स हायस्कूलचे शिक्षक अल्ताफ जहांगीर, एस. एस. मरबाशेट्टर तसेच शिक्षक रणजीत चौगुले उपस्थित होते.
दरम्यान, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार राजू शेठ हे सरकारी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून राजू शेठ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी दहावी परीक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹२५,००० चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्याची अभिनव योजना राबविली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन दिलेले हे प्रोत्साहन निश्चितच बेळगाव जिल्ह्याच्या निकालवाढीसाठी सकारात्मक ठरणार असून सरकारी शाळांबद्दल समाजात विश्वास निर्माण करणारा हा उपक्रम असल्याची भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.





