- बेळगाव लाईव्ह :डोक्यावर थोडा परिणाम झाल्याने एक दोन नव्हे तर तब्बल तीन-चार वर्षे गावातून बेपत्ता झालेला आणि भिक्षुक सदृश्य अवस्थेत पुन्हा अचानक वेंगुर्ला रोडवर आढळून आलेल्या एका वृद्ध इसमाला गावच्या श्री विठ्ठल -रखुमाई मंदिर कमिटी व बलभीम साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ववत आपलेसे करून आसरा देत माणुसकीचे दर्शन घडवल्याची घटना आज कुद्रेमानी (ता. जि. बेळगाव) येथे घडली.
संबंधित इसमाचे नांव अरुण पाटील (रा. कुद्रेमानी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 55 वर्षीय अरुण पाटील हा तीन-चार वर्षांपूर्वी गावातील गावडू पाटील व नारायण पाटील या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गडी म्हणून काम करत होता. पत्नीचे निधन झाल्यामुळे पश्चात कोणीही नसलेला अरुण शेतीच्या कामांमध्ये अतिशय कुशल होता. पत्नीच्या निधनानंतर मानसिक स्थिती बिघडून डोक्यावर थोडा परिणाम झालेला अरुण एक दिवस अचानक गावात दिसेनासा होऊन गायब झाला.
तेंव्हा शेतमालकांसह गावातील हितचिंतकांनी शोधा शोध करूनही परागंदा झालेला अरुण सापडला नव्हता. मात्र आता तीन-चार वर्षानंतर आज गुरुवारी सकाळी अचानक अरुण पाटील हा अंगावर कळकट मळकट कपडे, डोक्याचे वाढलेले केस व वाढलेली दाढी अशा भिक्षुकी अवस्थेत बेळगाव -वेंगुर्ला रोड वरील कुद्रेमानी फाट्याच्या ठिकाणी रस्त्याकडेला झाडाखाली बसलेला गावच्या श्री विठ्ठल -रखुमाई मंदिर कमिटीच्या सदस्यांना आढळून आला.

तेंव्हा त्यांनी त्याची विचारपूस केली. त्यानंतर कमिटीचे सदस्य व बलभीम साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांनी अरुण पाटील याला गावात आणून त्याची स्वच्छता केली. अरुण याला त्याचे डोक्याचे व दाढीचे केस कापून, आंघोळ घालून स्वच्छ कपडे परिधान करण्यास देण्यात आले.
यावेळी आपला हरवलेला माणूस पुन्हा गावात सुखरूप परतल्याचा आनंद उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सध्या तूर्तास अरुण पाटील याला श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आसरा देण्यात आला आहे.





