belgaum

मध्यवर्ती म.ए. समितीला नवे नेतृत्व; प्रकाश मरगाळे अध्यक्ष

0
348
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसह सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.


समितीचे झुंजार अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अलीकडील निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर मरगाळे यांची नियुक्ती करण्यात आली. ते यापूर्वी समितीचे खजिनदार म्हणून कार्यरत होते. मंगळवारी झालेल्या विशेष बैठकीत ठराव मांडून उपस्थित सर्व सदस्यांनी मरगाळे यांच्या नावाला एकमुखी अनुमोदन दिले.


निवड जाहीर झाल्यानंतर कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मरगाळे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 belgaum


कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी आपल्या भाषणात मरगाळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात मराठी जिल्हा पत्रकार संघाच्या एक लाख सह्यांच्या मोहिमेपासून होत असल्याचे नमूद केले. ही मोहीम तसेच कन्नड सक्तीविरोधातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


कर्नाटक सरकारच्या नामफलक धोरणावर भाष्य करताना किणेकर म्हणाले की, 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के इतर भाषा या नियमानुसार मराठीला योग्य प्रमाणात स्थान मिळाले पाहिजे. तसेच या धोरणाची अंमलबजावणी प्रथम सरकारी कार्यालयांपासून व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.


मराठी नामफलक हटविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला ठामपणे विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पुढील सर्व आंदोलन यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी मरगाळे यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीस सरचिटणीस तथा माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.