belgaum

मराठी सन्मान यात्रेतून सीमाभागात स्वाभिमानाचा नारा

0
725
 belgaum


बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी अस्मिता आणि भाषिक हक्कांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तीव्र आवाज उठला आहे. मराठी सन्मान यात्रेच्या निमित्ताने येळ्ळूर येथे झालेल्या जाहीर सभेत व्याख्याते नंदकुमार गोरुले यांनी मराठी समाजाने एकजूट राखत आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन केले. न्याय मागून मिळत नसेल तर तो लढ्याच्या बळावर मिळवावा लागेल, असे सांगत त्यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला.


महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे रविवारी राजहंसगड ते येळ्ळूर अशी मराठी सन्मान यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या निमित्ताने येळ्ळूर येथे झालेल्या जाहीर सभेत नंदकुमार गोरुले बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी वामन पाटील होते.

गोरुले म्हणाले, सीमाभागातील लढ्याला सत्तर वर्षांचा इतिहास आहे. या काळात अनेक चढउतार आले, तरी मराठी माणसाची लढाऊ वृत्ती कायम आहे. मात्र कानडी सक्तीविरोधात लढा देताना मराठी समाजात मतभेद निर्माण होऊ नयेत, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मराठी भाषा हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेली भाषा आहे. ती टिकवायची असेल तर मराठी समाजानेच तिचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.

 belgaum

ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतातील संस्कृतीचे रक्षण केले. सीमाभाग हा ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्राचा भाग असल्याचे अनेक नेत्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे मराठी माणसाचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत.

यावेळी शुभम शेळके यांनी मराठी सन्मान यात्रेच्या उद्देशाविषयी सांगताना मराठी भाषेचा सन्मान आणि तिच्या अधिकारांसाठी ही यात्रा सुरू करण्यात आल्याचे नमूद केले. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, मात्र मराठीवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनीही सीमाभागात कानडीकरण वाढत असल्याचा आरोप करत मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, अशी मागणी केली. न्यायालयाच्या आदेशांचे पालन होत नसल्याने मराठी समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असे ते म्हणाले.

सभेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन माजी आमदार मनोहर किणेकर आणि नंदकुमार गोरुले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर प्रकाश मरगाळे, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, ॲड. अमर येळ्ळूरकर, मालोजी अष्टेकर, ॲड. सुधीर चव्हाण, विकास कलगटगी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले, तर दुद्दप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.