बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठा सहकारी बँकेच्या आगामी नोकरभरती आणि संचालक मंडळाच्या कार्यकाळाबाबत पारदर्शकता असावी, या मागणीसाठी ‘कृतीशील मराठा समाजा’च्या वतीने बँकेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. बँकेचे सुशासन आणि ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी नियमांचे पालन व्हावे, असा सूर या निवेदनातून उमटला आहे.
बँकेत लवकरच २२ जागांसाठी नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती पूर्णपणे गुणवत्ताधारित आणि पारदर्शक असावी, अशी मागणी समन्वयकांनी केली आहे. यासाठी योग्य जाहिरात प्रसिद्ध करून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी होणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नोकरभरतीसोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार संचालकांच्या कार्यकाळाबाबतही स्पष्टता मागण्यात आली आहे. १० वर्षांचा सलग कार्यकाळ पूर्ण झालेल्या संचालकांसाठी ३ वर्षांचा ‘कुलिंग ऑफ’ कालावधी अनिवार्य आहे.
या कालावधीत संबंधित व्यक्तीला बँकेत कोणत्याही पदावर राहता येत नाही. या नियमाची अंमलबजावणी बँकेत कशी केली जात आहे आणि सध्याच्या संचालकांची स्थिती काय आहे, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी कृतीशील मराठा समाजाने केली आहे.
यावेळी अमित देसाई, दत्ता जाधव, चंद्रकांत कोंडुसकर, बळवंत शिंदोळकर आणि किरण हुद्दार आदी उपस्थित होते.





