belgaum

मराठा बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेवर संशयाचे मळभ

0
293
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील नामांकित मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेत सध्या सुरू असलेली नोकरभरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, बँकेच्या माजी उपाध्यक्षा आणि विद्यमान भागधारक नीना सुहास काकतकर यांनी या प्रक्रियेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

यासंदर्भात त्यांनी सहकार संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांना लेखी निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रशासकीय देखरेख ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे. बँकेच्या अंतर्गत प्रशासनात सध्या मोठा सावळागोंधळ सुरू असून, काही ठराविक संचालक आणि पदाधिकारी आपले वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी या भरती प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा दावा काकतकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, बँकेतील सत्ताधारी गट आपली जागा सोडायला तयार नसून, आपल्या मर्जीतील उमेदवारांची वर्णी लावण्यासाठी पारदर्शकतेला हरताळ फासला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नीना काकतकर यांनी आपल्या निवेदनात अत्यंत खळबळजनक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, नोकरभरतीची ही प्रक्रिया केवळ नावापुरती असून पडद्यामागून काही ठराविक व्यक्तींच्या वशिलेबाजीला प्राधान्य दिले जात आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभवाचा दाखला देत बँकेत ‘लैंगिक भेदाभेद’ आणि पक्षपातीपणाचे वातावरण असल्याचा आरोपही केला आहे. अशा दूषित आणि दबावाच्या वातावरणात सर्वसामान्य आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बँकेच्या काही माजी सहकाऱ्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नियमांचे उल्लंघन करून आपल्याच जवळच्या लोकांच्या नियुक्त्या करण्याचा घाट घातला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

 belgaum

या भरती प्रक्रियेत सहकार कायद्यातील नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होते की नाही, याची सहकार विभागाने प्रत्यक्ष देखरेख करावी. कोणत्याही प्रकारचा वशिलेबाजीचा किंवा गैरप्रकाराचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, जेणेकरून बँकेची प्रतिष्ठा आणि सार्वजनिक विश्वासार्हता टिकून राहील, अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

बँकेच्या माजी उपाध्यक्षा नीना सुहास काकतकर यांनी आपल्या तक्रारीत केवळ भरती प्रक्रियेवरच बोट ठेवले नाही, तर बँकेतील कामाच्या वातावरणाबद्दल अत्यंत गंभीर दावे केले आहेत. बँकेत सध्या महिला कर्मचारी आणि पदाधिकारी मुळीच सुरक्षित नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सत्तेवर असलेल्या संचालकांकडून किंवा प्रशासनाकडून होणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर गोष्टीचा किंवा चुकीच्या निर्णयाचा जाब विचारल्यास, तो अधिकार पदावरील व्यक्तींना मुळीच खपत नाही. उलट, सत्यासाठी आवाज उठवणाऱ्या महिलांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे पद्धतशीर काम बँकेत सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सहकार विभागाने केवळ नोकरभरतीवरच नव्हे, तर बँकेत सुरू असलेल्या या बेकायदेशीर कृत्यांवर कडक निर्बंध घालावेत. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना केली आहे.

मराठा बँकेच्या नोकरभरतीला नुकतीच मुदतवाढ मिळालेली असतानाच, आता माजी उपाध्यक्षांनीच भ्रष्टाचाराचे आणि प्रशासकीय अकार्यक्षमतेचे आरोप केल्याने बेळगावच्या सहकार वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या तक्रारीनंतर आता सहकार विभाग कोणती भूमिका घेते आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता येते का, याकडे सर्व सभासद आणि उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.