बेळगाव लाईव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात शेतीतील नवनवीन कल्पना कशाप्रकारे उत्पन्न वाढवू शकतात आणि ग्रामीण तरुणांना प्रेरणा देऊ शकतात, याचे उदाहरण देताना बेळगाव येथील एका शेतकऱ्याच्या मत्स्यपालनातील यशाचे कौतुक केले.
बेळगाव तालुक्यातील बोडक्यानट्टी गावातील 27 वर्षीय शेतकरी राजू शिवलिंगप्पा हुद्दार यांनी ‘मरळ’ या सापासारखे डोके असलेल्या माशांच्या संगोपनासाठी आधुनिक मत्स्यपालन पद्धती, विशेषतः बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वतःला एक यशस्वी उद्योजक म्हणून सिद्ध केले आहे.
कला शाखेतील पदवीधर असलेल्या राजू यांची सुरुवातीला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती; मात्र नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला. दुग्धव्यवसायासारख्या पर्यायांचा विचार केल्यानंतर त्यांनी शेतीची निवड केली. तसेच, उद्योग सुरू करण्यापूर्वी आवश्यक वैज्ञानिक पद्धती शिकण्याचा निर्णय घेतला.
“मला काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे होते. 2023-24 मध्ये मी आमच्या 4 एकर जमिनीपैकी एक एकर क्षेत्र मत्स्यपालनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. माझे वडील आणि भाऊ यांनी मला पाठिंबा दिला,” असे राजू यांनी सांगितले. त्यांनी शास्त्रीय पद्धतीने रचना केलेले चार तलाव उभारले आणि कौशल्य विकसित करण्यासाठी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून मत्स्यबीज आणले. तसेच, मत्स्यपालन तंत्राचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्यासाठी तुमकूर, मंड्या, विजयपुरा, हैदराबाद आणि विजयवाडा येथील केंद्रांना जवळपास एक वर्ष भेटी दिल्या.
या प्रकल्पात तलाव बांधकाम, मत्स्यबीज, खाद्य आणि औषधांसाठी सुमारे 31 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. यासाठी समाजसेवक शिवानंद नीलन्नवर यांचे आर्थिक सहाय्य लाभले. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत पहिल्या हंगामातून 25 लाख रुपयांचा महसूल मिळाला; दुसऱ्या हंगामातून 22 लाख रुपये मिळाले असून, आता तिसऱ्या हंगामात अधिक परताव्याची अपेक्षा आहे.
एकदा सुरुवातीची पायाभूत सुविधा उभारल्यानंतर खर्च केवळ मत्स्यबीज, खाद्य आणि देखभाल यांसारख्या आवश्यक बाबींवर मर्यादित राहतो. दैनंदिन काम प्रामुख्याने माशांना दिवसातून तीन वेळा खाद्य देण्यापुरतेच असते. विशेषतः हैदराबादमधील व्यापारी थेट फार्मवर येऊन माल खरेदी करतात, त्यामुळे त्वरित पैसे मिळण्याची खात्री होते.

उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये मरळ माशाला मोठी मागणी असून त्याला 250 ते 320 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याचे राजू यांनी सांगितले.
मत्स्यपालन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजू यांच्या कामाचे कौतुक केले असून, परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी शाश्वत व फायदेशीर पद्धती अवलंबण्याचा आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.





