बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत गायल्याप्रकरणी मराठी भाषिक युवकांवर दाखल करण्यात आलेल्या पोलीस गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संबंधित मान्यवरांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा करताना तसेच भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना काही युवकांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्यगीत गायले होते.
या घटनेवरून काही कन्नड संघटनांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मराठी भाषिक युवकांवर गुन्हे दाखल केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही कारवाई अन्यायकारक असून भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असल्याचा आरोप समितीने केला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संविधानाच्या कलम २९(१) नुसार प्रत्येक नागरिकाला आपली भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. तसेच कलम १९(१)(अ) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळालेला आहे. त्यामुळे सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून गीत गाणे हा गुन्हा ठरू शकत नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे.

याशिवाय काही कन्नड संघटनांकडून मराठी भाषिकांना ‘राष्ट्रद्रोही’ व ‘राज्यद्रोही’ अशी संबोधने करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा प्रकारचे आरोप केवळ मानहानीकारकच नाहीत तर भाषिक वैमनस्य वाढविणारे असल्याचेही समितीचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारने या संवेदनशील विषयात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. बेळगावातील मराठी युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी कर्नाटक सरकारशी चर्चा करावी, मराठी भाषिकांना ‘राष्ट्रद्रोही’ म्हणणाऱ्यांवर कारवाईची मागणी करावी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सीमाभागातील मराठी समाजाच्या भाषा, संस्कृती व अस्मितेच्या रक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने ठाम भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.





