बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर्सचा कोणताही तुटवडा नसून सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा उपलब्ध असून नागरिकांनी विनाकारण साठा करू नये, असे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

देशभरात एलपीजी उत्पादन आणि बॉटलिंग प्रक्रियेत वाढ झाल्याने घरगुती गॅसची कमतरता भासणार नाही, सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, अशी प्रतिक्रिया बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केली.
एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असल्याने आयव्हीआरएस यंत्रणेवर ताण येत आहे, त्यामुळे आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल कंपन्यांनी गॅस बुकिंगसाठी व्हॉट्सॲप, मिस कॉल आणि मोबाईल ॲप्ससह सहा पर्याय दिले आहेत. ग्राहकांनी या पर्यायांचा वापर करावा आणि दोन बुकिंगमध्ये ४५ दिवसांचे अंतर ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यात गॅसचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी चिंता करू नये आणि तक्रार असल्यास ०८३१-२४०७२८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच गॅसचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.





