बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील अवरोळी, गंधिगवाड, कडतन बागेवाडी, चिकदिनकोप, पारिशवाड, हिरेमुन्नोळी, चिकहट्टिहोळी, इटगी क्रॉस, एम.के. हुबळी आणि बिडी या परिसरातील हिरव्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांची परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून मोठी आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे.
गावागावांत अनधिकृत खरेदी केंद्रे थाटून शेतमालाच्या वजनात अफरातफर करणे आणि कोट्यवधी रुपये थकवून व्यापारी पसार होण्याचे प्रकार वाढल्याने, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील या प्रमुख गावांमध्ये हिरव्या मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते, मात्र परराज्यातील आणि बाहेरील जिल्ह्यांतील व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांना हरताळ फासून थेट गावांतच आपली खरेदी केंद्रे चालवत आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याने मोजकेच व्यापारी संगनमताने मिरचीचे दर पाडत आहेत, परिणामी शेतकऱ्यांना स्पर्धात्मक भाव मिळत नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे, अनेक व्यापारी माल घेऊन गेल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे न देताच पसार झाले आहेत. या आर्थिक फसवणुकीमुळे काही शेतकऱ्यांना आपली देणी भागवण्यासाठी जमिनी विकाव्या लागल्या आहेत, तर काहींनी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गावागावांत चालणारी ही अनधिकृत खरेदी आणि वजनातील हेराफेरी तातडीने थांबवून प्रशासनाने या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, हिरव्या मिरचीची सर्व खरेदी ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर लिलाव पद्धतीने करण्यात यावी, जेणेकरून व्यवहाराला कायदेशीर संरक्षण मिळेल.
प्रशासनाने याप्रकरणी तातडीने पावले न उचलल्यास संपूर्ण खानापूर तालुक्यातील शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती कृषी विपणन विभागाचे उपसंचालक आणि एपीएमसी सचिवांनाही सादर करण्यात आल्या आहेत.





