बेळगाव लाईव्ह ; काकती येथील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या श्री अष्टविनायक ऑटो गॅरेज या गॅरेजला भीषण आग लागून दोन दुचाकींसह स्पेअर पार्ट्स वगैरे सर्व साहित्य भस्मसात झाल्यामुळे सुमारे 7 लाख रुपयांचे लाखाचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली.
आगीच्या भक्षस्थानी पडलेले गॅरेज युवा मेकॅनिक विक्रम आनंदाचे यांच्या मालकीचे आहे. गरीब कुटुंबातील विक्रम यांने स्वकष्टातून कर्ज काढून हे गॅरेज चालू केले होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह या गॅरेजवर अवलंबून होते. आज सोमवारी पहाटे श्री अष्टविनायक ऑटो गॅरेज मधून धुर येत असल्याचे निदर्शनास येताच आसपासच्या लोकांनी त्याची माहिती विक्रम आनंदाचे त्याला दिली. तेंव्हा त्वरेने गॅरेजकडे आलेल्या विक्रम याने गॅरेज उघडून पाहिले असता आतमध्ये आग लागून संपूर्ण साहित्य भस्मसात झाले असल्याचे निदर्शनास आले.
गॅरेजला आग लागल्याची माहिती मिळताच समाजसेवक गजानन गव्हाणे यांनी अग्निशामक दलाला सतर्क केले. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण आग विझवली परंतु तोपर्यंत गॅरेज मधील सर्व कांही भस्मसात झाले होते. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. आगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नसले तरी या दुर्घटनेमुळे विक्रम आनंदाचे याचे जवळपास 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्याची परिस्थिती पाहता त्याला आर्थिक मदतीची गरज असून प्रशासनाने त्याची पूर्तता करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच यावर्षी काकती गावामध्ये आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. फाइव्ह स्टार हॉटेल्स, औद्योगिक वसाहत यामुळे काकती गावची लोकसंख्या दिवसे दिवस वाढत आहे यामुळे या गावांमध्ये अग्निशामक दलाचे केंद्र होणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. उपरोक्त दुर्घटनेची काकती पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.
दुर्घटनास्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना गॅरेज मालक विक्रम आनंदाचे याने सांगितले की, माझं हे गॅरेज 2014 पासून सुरू असून आज सकाळी गॅरेजमधून धूर येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी मला दिली. तेव्हा मी त्वरेने येऊन गॅरेज उघडले असता आगीचा प्रकार निदर्शनास आला. आगीमध्ये गॅरेजमधील स्पेअर पार्ट्स वगैरे संपूर्ण साहित्य बेचिराख झाले आहे. माझा चरितार्थ या गॅरेजवर चालत होता. माझ्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन या गॅरेज मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालत होते गॅरेजसाठी मी कर्ज देखील काढला असून आता त्याची परतफेड कशी करायची हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे.

गॅरेज मधील साहित्य जळून खाक होण्याबरोबरच आणखी एक भुर्दंड म्हणजे ग्राहकांच्या दोन दुचाकीगाड्या देखील आगीत जळाल्या आहेत. त्यांचे रंगकाम करून त्या दुचाकींसाठी आवश्यक असलेले कांही ओरिजनल साहित्य मी हुबळी हुबळीहून मागवले होते. असे सांगून आगीच्या दुर्घटनेमुळे मोठा धक्का बसलेल्या विक्रम आनंदाचे याने आपले डोके सुन्न झाले असून काय करावे सुचत नसल्याचे सांगितले. तसेच ओढवलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाने आपल्याला सहकार्य करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते गजानन गव्हाणे यांनी काकतीमध्ये या वर्षात या पद्धतीने तिसरी आगीची दुर्घटना घडली आहे. आज पहाटे विक्रम आनंदाचे याच्या गॅरेजला लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीचे कारण समजू शकलेले नसून या दुर्घटनेमुळे विक्रम याच्यावर मोठे संकट कोसळले असल्यामुळे प्रशासनाने त्याला आर्थिक सहाय्य करावे अशी विनंती करून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन काकती येथे अग्निशामक दलाचे केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी गव्हाणे यांनी केली.





