belgaum

जय महाराष्ट्र’ गीत गायल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

0
1043
 belgaum

‘बेळगाव लाईव्ह : भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर बेळगावमधील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात विजयोत्सव साजरा करताना ‘जय महाराष्ट्र’ गीत म्हटल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून कन्नड संघटनांच्या तक्रारीनंतर ही कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

विनायक राजपूत (बापट गल्ली), सुनील पाटील (कंग्राळ गल्ली) आणि शुभम ठाकूर (गणाचार गल्ली) यांच्यासह अन्य एकावर बेळगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. काल रात्री राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या जल्लोषात ‘जय जय महाराष्ट्र’ हे गीत लावल्याने स्थानिक कन्नड भाषिकांनी आक्षेप घेतला. या गीतामुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच कर्नाटक रक्षण वेदिकेचे (करवे) जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांकडे दाद मागितली. या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेत पोलिसांनी तत्काळ तपास करून संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 belgaum

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये नेहमीच संवेदनशील वातावरण असते. मात्र, इतर भाषिकांच्या गाण्यांना परवानगी असताना केवळ मराठी गीतावरून गुन्हे दाखल करणे, हा प्रशासनाचा दुटप्पीपणा असल्याची चर्चा आता बेळगावात रंगू लागली आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गीत लावणे प्रक्षोभक असल्याचे सांगत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेळगाव पोलीस करत असून शहरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र उल्लेख असलेला केवळ फलकच नव्हे तर घोषणा आणि आता गाणे यावरही कर्नाटक सरकारची वक्रदृष्टी आहे हे या कारवाईवरून सिद्ध झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.