belgaum

कर्नाटकसह महाराष्ट्रात घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा

0
345
 belgaum


बेळगाव लाईव्ह : हारूगेरी आणि परिसरात बंद घरांची कुलपे तोडून चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ३६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथील विद्यानगरमध्ये अभिषेक सुरेश पांडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी २८ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीच्या वस्तूंसह शेजारील सरस्वती बडिगेर यांच्या घरातूनही दागिने व रोकड लंपास केली होती. याप्रकरणी हारूगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. आर. बसरगी तसेच अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे जालना आणि परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सात आरोपींना अटक केली. यामध्ये रवी अण्णा शिंदे, सुनील नाथा पवार, शंकर ऊर्फ बिहारी सायबा जाधव, दिलीप तुकाराम शिंदे, किशोर राजबहु मोरे, विनोद गंगाराम शिंदे आणि मिथुन चिम्माजी जाधव यांचा समावेश आहे.

 belgaum

पोलिसांनी या आरोपींकडून २९ लाख रुपये मतेचे २६ तोळे ७ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ लाख २ हजार रुपये किमतीची १ किलो ८० ग्रॅम चांदी, साडेतीन लाखांची कार, ५० हजार रुपयांचे ६ मोबाईल आणि रोकड असा एकूण ३६ लाख ११ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेले हे आरोपी आंतरराज्य स्तरावरील कुख्यात चोरटे असून त्यांनी अथणी, उगार, चिकमंगळूर, गुलबर्गा, विजापूर, कोळार, हरप्पनहळ्ळी, चित्रदुर्ग, रामनगर, तुमकूर, बागलकोट, द्रावणगेरे, गदग आणि हासन अशा विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

हारूगेरी वर्तुळाचे सीपीआय रतनकुमार जीरग्याळ आणि पीएसआय माळप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात एम. डी. हिरेमठ, एस. ए. पाटील, आर. एम. मुंदिनमणी, एस. एम. हलकी आणि कुडची, कागवाड, अथणी येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.