belgaum

खाजगी जमिनीतील झाडांची बेकायदा कत्तल; जमीन मालकाची न्यायाची मागणी

0
675
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील कुमारस्वामी लेआउट या नव्या वसाहतीतील सर्व्हे नं. 199/5 (बी) या माझ्या खासगी मालकीच्या जमिनीतील झाडे रातोरात बेकायदेशीररित्या तोडून नेण्यात येत आहेत. तेंव्हा जिल्हा वनाधिकाऱ्यांनी (डीएफओ) याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याद्वारे मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जमिनीचे मालक मधु पाटील यांनी केली आहे.

कुमार स्वामी लेआउट येथे आज सोमवारी सकाळी ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते. पाटील यांनी सांगितले की, कुमारस्वामी लेआउट या नव्या वसाहतीतील सर्व्हे नं. 199/5 (बी) या ठिकाणी वसाहत निर्माण होण्यापूर्वी 2006 मध्ये बुडाकडून माझ्या वडिलांच्या नावे एक नोटीस आली होती. तत्पूर्वी 1990 मध्ये मी या ठिकाणी लागवड केलेल्या 700 झाडांपैकी जवळपास 380 झाडे जमिनीच्या उताऱ्यावर ही नोंद केली आहेत. त्यामुळे झाडांसंदर्भात ज्यावेळी आमच्याकडे नोटीस आली, त्यावेळी मी बुडाकडे आक्षेप नोंदवून संबंधित झाडे माझ्या मालकीचे आहेत हे स्पष्ट केले होते.

या खेरीज गॅझेटनुसार सदर झाडे शेतकऱ्यांची असून ती ते स्वतः तोडून घेऊ शकतात असे नमूद आहे. मात्र झाडे केंव्हा तोडायची? ती तोडण्याची परवानगी कोणाकडून घ्यायची? हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. या संदर्भात मी शंभरदा बुडा आणि वनखात्याच्या कार्यालयाला भेटी दिल्या. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सुरू झालेला माझ्या मालकीची झाडे तोडण्याचा प्रकार पाहता वनखाते हे झाडांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आहे की ती नष्ट करण्यासाठी आहे? हा प्रश्न पडतो.

 belgaum

मागील वेळेला वनखात्याच्या सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) अधिकाऱ्यांनी माझ्या जमिनीतील झाडे तोडण्याचा आदेश दिला होता, ज्याला मी तीव्र विरोध केला. या संदर्भात मी तक्रार देखील नोंदवली आहे. मात्र दुर्दैवाने त्यासंदर्भात अद्यापपर्यंत गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर नवी वसाहत विकसित करताना सातत्याने या ठिकाणची माझ्या मालकीची पूर्ण वाढ झालेली 100 हून अधिक झाडे बेकायदेशीररित्या तोडून नेण्यात आली आहेत. शिसम सारखी जी तोडणे अजामीन पात्र गुन्हा आहे अशा झाडांचा देखील त्यामध्ये समावेश होता.

सदर 30 -40 वर्षे जुनी झाडे तोडल्यानंतर खरंतर मालक या नात्याने लाखो रुपये किमतीच्या या झाडांची नुकसान भरपाई मला मिळावयास हवी, परंतु वेळोवेळी विचारणा करूनही बुडा अथवा वनखात्याने मला आजपर्यंत एक पैसाही दिलेला नाही. वन खात्याचे झाडे तोडण्याची व पैसे देण्याची ही कृती न शोभणारी अतिशय दुर्दैवी आहे. सरकार वनीकरणासाठी करोडो रुपये खर्च करते.

दुसरीकडे आमच्यासारखे शेतकरी टँकरने पाणी विकत घेऊन झाडे लावून त्यांचे संवर्धन करत असतात आणि बुडा किंवा वनखात्यासारखे सरकारी विभाग ती झाडे रातोरात तोडून नेतात, याच्या इतकी नालायक गोष्ट कोणतीही नाही असे संतप्त मत व्यक्त करून मधु पाटील यांनी बुडा वनाखात्याच्या झाडे तोडण्याच्या कृतीचा तीव्र निषेध केला.

त्याचप्रमाणे झाडे तोडण्यामध्ये या नव्या वसाहतीत भूखंड घेणाऱ्यांचाही हात असून ज्याला बुडा व वनखात्याची फुस आहे, असा आरोप करण्याबरोबरच सध्या तोडण्यात आलेल्या माझ्या जागेतील झाडांची जिल्हा वनाधिकाऱ्यांनी (डीएफओ) गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेवटी पाटील यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.