बेळगाव लाईव्ह :हुबळी विमानतळ आणि बेळगाव विमानतळाच्या समान मागण्यांकडे दुर्लक्ष करून मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिल्याबद्दल कर्नाटकातील पायाभूत सुविधा विकास मंत्री एम. बी. पाटील यांनी बुधवारी केंद्र सरकारवर टीका केली.
हुबळी आणि बेळगाव विमानतळाच्या समान मागण्यांकडे दुर्लक्ष करताना मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याचा निर्णय भेदभावपूर्ण आणि अस्वीकार्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. मंत्री एम. बी. पाटील यांनी कर्नाटकच्या विनंतीवर असाच विचार का केला गेला नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ही कृती तामिळनाडूतील आगामी निवडणुकीशी जोडले जाऊ शकते असे संकेतही मंत्री पाटील यांनी दिले.
हुबळी आणि बेळगावमधील विमानतळांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यास केंद्र सरकारची अनिच्छा कर्नाटकच्या पायाभूत सुविधांच्या मागण्यांकडे असलेल्या दृष्टिकोनाबद्दल चिंता व्यक्त करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.





