बेळगाव लाईव्ह ;खानापूर तालुक्यातील सिंगिंनकोप (ता. खानापूर) येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी (दि. 9 मार्च 2026) सायंकाळी घडलेल्या या घटनेत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून कुंभार कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगिंनकोप येथील रहिवासी स्वाती संतोष कुंभार यांच्या घरात सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार घरातील विद्युत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्यानंतर काही क्षणांतच तिने भीषण रूप धारण केले.
घरात ठेवलेले कपडे, दागिने, रोख रक्कम, टीव्ही, फ्रिज, फर्निचर तसेच इतर घरगुती साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेजारील बोरवेलची मोटार सुरू करून पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळात अग्निशामक दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. ग्रामस्थांच्या मदतीने अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले;
मात्र तोपर्यंत घरातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते.
या दुर्घटनेत घरातील सर्व वस्तू जळाल्यामुळे कुंभार कुटुंबाकडे अंगावरील कपड्यांशिवाय काहीही उरले नाही. त्यामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
दरम्यान, या घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पीडित कुंभार कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





