बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील एका निवृत्त शिक्षकाच्या मुलाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘युपीएससी’ परीक्षेत ७३९ वी रँक मिळवून मोठे यश संपादन केले आहे. पाचव्या प्रयत्नात आपले ध्येय गाठणाऱ्या या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बैलहोंगल तालुक्यातील मेकलमर्डी गावचे रहिवासी असलेल्या बसवराज मडिवाळप्पा पाटील (२८) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. बसवराज यांचे वडील मडिवाळप्पा हे सरकारी प्राथमिक शाळेतील निवृत्त शिक्षक असून, आई शांतव्वा या गृहिणी आहेत. बसवराज यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झाले असून त्यांनी २०१९ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली होती.
इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर कोणत्याही कंपनीत नोकरी न स्वीकारता बसवराज यांनी युपीएससीचा मार्ग निवडला. दिल्लीत कोचिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेंगळुरूमध्ये राहून सराव सुरू केला. सलग चार वेळा मुख्य परीक्षेत अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही आणि पाचव्या प्रयत्नात ७३९ वी रँक मिळवून यश मिळवले.

या यशानंतर प्रतिक्रिया देताना बसवराज पाटील यांनी आनंद व्यक्त केला. मला अधिक चांगल्या रँकची अपेक्षा होती, तरीही उत्तीर्ण झाल्याचा मोठा आनंद आहे. हे यश मी माझे आई-वडील आणि बहिणींना समर्पित करतो, असे बसवराज पाटील यांनी म्हटले.
अभ्यासाबाबत बोलताना बसवराज यांनी संयम आणि सातत्याचे महत्त्व सांगितले. मी दररोज ८ ते १० तास अभ्यास करत होतो. चार वेळा अपयश आले तरी मी धीर सोडला नाही. कठोर परिश्रम आणि सततच्या सरावामुळेच मला हे यश मिळाले आहे. युपीएससी देणाऱ्या उमेदवारांकडे संयम आणि स्मार्ट वर्क करण्याची जिद्द हवी, असे मत बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.





