belgaum

मिरची उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट ; निवेदन

0
399
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कित्तूर आणि बैलहोंगल या प्रमुख तालुक्यांमध्ये सध्या हिरव्या मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. मात्र, या भागातील मिरची उत्पादक शेतकरी सध्या खासगी व्यापाऱ्यांच्या विळख्यात अडकले असून, त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप कर्नाटक राज्य रयत संघ महासंघाने केला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

बाहेरील जिल्ह्यांतून येणारे खासगी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात किंवा गावागावांत जाऊन आपली अनधिकृत खरेदी केंद्रे थाटत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बीरप्पा देशनूर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

ते म्हणाले की, गावागावांत केवळ एक-दोनच व्यापारी सक्रिय असल्याने ते आपसात संगनमत करून मिरचीचे दर पाडतात. यामुळे हक्काचा घाम गाळून पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारातील स्पर्धात्मक भाव मिळत नाही.

 belgaum

विशेष म्हणजे, हे व्यापारी सरकारला कोणताही कर किंवा अधिकृत शुल्क भरत नसल्याने सरकारी तिजोरीचेही मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये न देताच पळ काढल्याच्या अनेक घटना घडल्या असून, त्याची रीतसर नोंद पोलीस स्थानक आणि एपीएमसी कार्यालयातही आहे. तरीही अशा वंचक व्यापाऱ्यांवर जरब बसवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

कर्नाटक राज्य रयत संघ महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात , गावागावांत बेकायदेशीरपणे चालणारे हे खासगी खरेदी काटे त्वरित बंद करण्यात यावेत. मिरचीची खरेदी केवळ अधिकृत बाजारपेठेत, जाहीर लिलावाद्वारे आणि पारदर्शक वजनमापानेच झाली पाहिजे.

तसेच, माल विकल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे तात्काळ मिळतील याची खात्री प्रशासनाने करावी. फसवणूक करून पसार होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.. या प्रसंगी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.