belgaum

इंगळ्या नाहण्याच्या परंपरेने दुमदुमले धामणे

0
525
 belgaum

बेळगाव लाईव्ह :धामणे गावातील कुलदैवत श्री बसवाण्णा देवाची पारंपरिक यात्रा यंदा विशेष उत्साहात पार पडली. गावच्या शतकानुशतकांच्या परंपरेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या इंगळ्या नाहण्याच्या अनोख्या विधीने मंगळवार दि. 10 रोजी यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. “हर हर महादेव” च्या जयघोषात सुमारे 12 ते 14 हजार भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून श्रद्धा व्यक्त केली.

यात्रेची सुरुवात सोमवार दि. 9 रोजी पहाटे बसवाण्णा देवाच्या अभिषेक व पूजनाने झाली. त्यानंतर श्री कलमेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीचे विधीवत पूजन करून इंगळ्यांच्या गाड्यांची सुरुवात करण्यात आली. कलमेश्वर मंदिरापासून बसवाण्णा मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणुकीतून गाड्यांची ने-आण होत गावभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

दुपारनंतर गावातील हक्कदारांचे आंबली व सिपण्याचे गाडे बसवाण्णा मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत परंपरा जपण्यात आली. सायंकाळी बसवाण गल्लीमध्ये गाडे पळविण्याचा पारंपरिक कार्यक्रम देवस्थान पंचकमिटी व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. रात्री मंदिरासमोर कन्नड शाहीरांच्या गाण्यांनी यात्रेला सांस्कृतिक रंगही चढवला.

 belgaum

मंगळवारी सकाळी धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी व देवगणहट्टी येथील सवारी मंडळांनी सजविलेल्या बैलजोड्यांच्या गाड्यांची गुलाल उधळत गावभर भव्य मिरवणूक काढली. दुपारी बसवाण्णा मंदिरासमोर इंगळ्या रचून त्याचे पूजन करून त्या पेटविण्यात आल्या.

सायंकाळी बसवाण्णा देवाला अभिषेक घालून बाशिंग बांधण्यात आले. देवस्थान पंचकमिटीच्या वतीने गावातील हक्कदारांना पानविडे देण्यात आले आणि इंगळ्यांमध्ये नारळ उडविण्याची परंपरा पार पाडण्यात आली. त्यानंतर इंगळ्या नाहण्याच्या मुख्य विधीला सुरुवात झाली.

जवळपास दोन तास चाललेल्या या अनोख्या धार्मिक विधीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला. “हर हर महादेव” च्या घोषात भक्तांनी इंगळ्या नाहून श्रद्धा व्यक्त केली. या भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.रात्री बसवाण्णा मंदिरासमोर कोल्हापूर येथील मराठी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला आणि पारंपरिक उत्साहात यात्रोत्सवाची सांगता झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.