बेळगाव लाईव्ह : सायबर गुन्हेगारांनी आता सर्वसामान्यांच्या बँक खात्यांनाच आपले ढाल बनवले असून, बेळगाव जिल्ह्यात याचे एक भयावह जाळे उघडकीस आले आहे. स्वतःचे बँक खाते, एटीएम किंवा सिम कार्ड गुन्हेगारांना भाड्याने देण्याचे प्रमाण वाढले असून, खुद्द सीआयडी (CID) कार्यालयाने बेळगावमधील तब्बल १४०० संशयास्पद खात्यांची यादी जिल्हा पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन मोठे गुन्हे दाखल केले असून, आरोपींनी स्वतःच्या आणि ओळखीच्या लोकांच्या नावावर उघडलेल्या खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल केल्याचे समोर आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील संशयास्पद बँक खात्यांची यादी जिल्हा पोलिसांच्या स्वाधीन केली असून, या प्रकरणाचा तपास आता युद्ध पातळीवर सुरू झाला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा केला. सायबर भामटे ग्रामीण भागातील किंवा गरजू लोकांना विविध आमिषे दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडतात. एकदा का खाते उघडले की, त्याचे पासबुक, एटीएम कार्ड आणि संबंधित सिम कार्ड हे भामटे स्वतःकडे घेतात. या खात्यांचा वापर जगभरातून सायबर फसवणूक करून मिळवलेले पैसे वळवण्यासाठी केला जातो. या संदर्भात बेळगाव पोलिसांनी जिल्ह्यात आतापर्यंत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करून मोठी कारवाई केली आहे:
१. निपाणी प्रकरण: येथील पाच आरोपींनी स्वतःच्या नावावर बँक खाती उघडून ती सायबर टोळीला वापरण्यास दिली होती. केवळ ५ खात्यांवरून देशभरात १४ गुन्हे दाखल असून, यातून तब्बल ४६ लाख १२ हजार ५५१ रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत.
२. चिक्कोडी (केरूर) प्रकरण: येथील दोन आरोपींनी चक्क आपल्या ओळखीच्या लोकांचा विश्वास संपादन करून त्यांची १५ बँक खाती, पासबुक, एटीएम आणि सिम कार्ड हस्तगत केली. या खात्यांचा संबंध देशभरातील ६८ सायबर गुन्ह्यांशी असल्याचे निष्पन्न झाले असून, याद्वारे ४२ लाख १३ हजार ७६ रुपयांची अफरातफर झाली आहे.
३. रामदुर्ग (सुरेबान मनिहाळ) प्रकरण: येथील एका आरोपीने स्वतःच्या नावे ४ खाती उघडून ती सायबर गुन्ह्यांसाठी भाड्याने दिली होती. या खात्यांवर विविध राज्यांत ८ गुन्हे दाखल असून १४ लाख ३१ हजार ३०१ रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
“अनोळखी व्यक्तीला किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, एटीएम किंवा सिम कार्ड देणे हा केवळ निष्काळजीपणा नसून तो गंभीर गुन्हा आहे. अशा कृत्यामुळे तुम्ही नकळत सायबर गुन्हेगारांना मदत करत आहात. जर तुमच्या खात्यातून फसवणुकीचे व्यवहार झाले, तर तुम्हालाही कायदेशीर कारवाईला आणि तुरुंगवासाला सामोरे जावे लागेल,” असा कडक इशारा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला आहे.
सध्या पोलीस या आरोपींच्या संपर्कात असलेल्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेत असून, १४०० संशयास्पद खात्यांची कसून चौकशी केली जात आहे.





