belgaum

महिला सक्षमीकरणाचा प्रवास ‘महिला आघाडी हॉटेल’ टिळकवाडीत

0
1551
 belgaum

बेळगाव लाईव्ह :“इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू जाई गगनावरी…” या उक्तीचा प्रत्यय देणारी एक प्रेरणादायी वाटचाल आज बेळगाव शहरात नव्या उंचीवर पोहोचत आहे. 2014 साली महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने सुरू झालेले महिला आघाडी हॉटेल आज आपल्या दुसऱ्या शाखेसह विस्तारत आहे.

बेळगावातील टिळकवाडी परिसरातील मराठा कॉलनी येथे या नव्या शाखेचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे. एक दशकापूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाने केवळ झुणका-भाकर केंद्र म्हणून सुरुवात केली होती; मात्र अल्पावधीतच चविष्ट, घरगुती जेवण आणि खास करून चुलीवरच्या अस्सल मटणासाठी हे हॉटेल रसिकांच्या पसंतीस उतरले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी उपमहापौर रेणू सुहास किल्लेकर यांच्या पुढाकारातून शनिवार खुट येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. महिलांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा ध्यास आज या यशस्वी विस्तारातून स्पष्टपणे दिसून येतो.

 belgaum

विशेष म्हणजे, या नव्या शाखेचे उद्घाटन हॉटेलमधील पहिल्या महिला कर्मचारी शेवंता भोसले यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या हस्ते फीत कापून हा समारंभ पार पडणार असून, ही बाब या उपक्रमाच्या मुळातील ‘महिला सक्षमीकरणा’च्या भावनेला अधोरेखित करणारी आहे.

टिळकवाडीतील काँग्रेस रोड परिसरात ‘हॉटेल महिला आघाडी’च्या नव्या शाखेमुळे आता नागरिकांना चवीचे मटण-भाकरी आणि चुलीवर बनवलेले पारंपरिक पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीचे पदाधिकारी, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा रेणू सुहास किल्लेकर यांनी केले आहे.

हा प्रवास केवळ एका हॉटेलचा विस्तार नसून, तो आहे महिलांच्या स्वाभिमानाचा, आत्मनिर्भरतेचा आणि जिद्दीचा—एक प्रेरणादायी अध्याय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.