बेळगाव लाईव्ह :रंगपंचमी अर्थात धुलीवंदन सण तोंडावर आल्यामुळे बेळगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सणाच्या पार्श्वभूमीवर शहराची बाजारपेठ विविध रंगांसह पिचकाऱ्या, फुगे, मुखवटे वगैरे विविध आकर्षक साहित्यांनी सजलेली पहावयास मिळत आहे.
यंदा रंगपंचमीचा सण येत्या मंगळवार दि. 3 मार्च रोजी साजरा होत असल्यामुळे शहरात उत्साह दिसून येत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, शहापूर, टिळकवाडी, अनगोळ वगैरे परिसरातील दुकाने रंगांनी नटली आहेत. बाजारपेठेतील रस्त्यांवर पावला पावलावर रंगपंचमीच्या रंगांसह साहित्याचे स्टॉल्स थाटण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी रंगांची रेलचेल दिसत आहे.
दुकानदार, विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे रंग, गुलाल, रंगीत पावडर, पाण्याच्या पिचकाऱ्या, फुगे, आकर्षक मुखवटे, टोपी टी-शर्ट वगैरे विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिक तसेच युवा व बालचमुची गर्दी होत आहे. यंदा रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक आणि त्वचेला अपाय न करणाऱ्या रंगांना ग्राहकांनी पसंती द्यावी, असे आवाहनही केले जात आहे.
लहान मुलांसाठी कार्टून थीमच्या पिचकाऱ्या आणि रंगीत फुग्यांची मागणी वाढली आहे. आज रविवार असल्यामुळे रंगपंचमीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेष गर्दी दिसत असली तरी सणाच्या आदल्या दिवशी यापेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

बेळगाव लाईव्हशी बोलताना पांगुळ गल्ली येथील डिके आर्ट्सचे मालक दौलत महादेव कावळे यांनी रंगपंचमीसाठी उपलब्ध असलेले रंग व साहित्य बद्दल माहिती दिली. होळी व रंगपंचमी निमित्त दरवर्षी नवनवे साहित्य बाजारात येत असते. त्या अनुषंगाने यंदा नवे साहित्य म्हणजे कलर सिलेंडर, वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे (मास्क), लहान मुलांचे आकर्षण ठरणारी इलेक्ट्रिक गन व मोठ्या रॉकेट पिचकाऱ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या साहित्यासह यावेळी त्वचेला इजा न पोहोचवणाऱ्या नैसर्गिक रंगांना अधिक मागणी आहे. याव्यतिरिक्त मुलांसाठी ताशे, मॅजिक बलून्स, सिल्वर कलर वगैरे गोष्टी विक्रीसाठी आल्या आहेत. रंगाच्या पिचकाऱ्या 20 रुपयांपासून 1000 ते 1500 रुपये पर्यंतच्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये सारखे सारखे रंगाचे पाणी भरावे न लागणाऱ्या पाठीवर अडकवण्याचे पाण्याचे टॅंक असलेल्या पिचकार्यांचा समावेश आहे, असे दौलत कावळे यांनी सांगितले.
रंगपंचमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. याखेरीज सामूहिक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कांही प्रमुख गल्ल्यांमध्ये पाण्याचे स्प्रिंकलर्स उभारण्यात येत आहेत.





