बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत नुकतीच महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली असून, या सत्तांतराच्या आडून आता मराठी भाषिकांना टार्गेट करण्याचे नवे राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सीमाप्रश्न आणि मराठी भाषेला कायदेशीररित्या अडचणीत आणण्यासाठी नव्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने कन्नड संघटनांनी आता महापालिकेत आपले नवनवे ‘नाटक’ सुरू केल्याची चर्चा सीमाभागातील मराठी भाषिकांसह आता उर्दू भाषिकांमध्येही सुरु झाली आहे.
नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर सीमाभागात जाणीवपूर्वक भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कित्तूर कर्नाटक सेनेसह अनेक कन्नड संघटनांकडून केला जात आहे.
नामफलकांवर ६० टक्के कन्नड भाषेची सक्ती करण्याच्या नावाखाली या संघटनेने आज महापालिकेवर मोर्चा काढला. या आंदोलकांनी केवळ मराठीच नव्हे, तर उर्दू भाषेवरही आपली वक्रदृष्टी वळवून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.

कन्नड कार्यकर्त्यांच्या मुजोरीने आज मर्यादा ओलांडली असून, महेश शिगीहळ्ळी या कन्नड कार्यकर्त्याने मराठी भाषेची तुलना थेट कचऱ्याशी केली आहे. ज्याप्रमाणे कचरा टाकणाऱ्यांवर दंड आकारला जातो, त्याच धर्तीवर मराठी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्याने आयुक्तांकडे केली आहे. या विखारी मागणीमुळे समस्त बेळगावकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
‘बेळगाव हा कर्नाटकचाच भाग आहे’ असा सीमाप्रश्न विरोधी ठराव एका महिन्यात महापालिकेत मंजूर करावा, अन्यथा ठिय्या मांडण्याची पोकळ वल्गना या संघटनेने केली आहे. महापालिकेत सध्या सुरू असलेले हे मराठीविरोधी राजकारण आणि कन्नड संघटनांचे हे नवे डावपेच सीमाभागातील सलोखा बिघडवणारे ठरत असून, मराठी भाषिकांकडून याचा तीव्र निषेध केला जात आहे.





