belgaum

सिटीस २.०’ योजनेसाठी मनपाची मंजुरी

0
231
City corporation logo
City corporation logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘सिटीस २.०’ योजनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिकेचा २० टक्के आर्थिक वाटा देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव महापौर मंगेश पवार यांनी आज सर्वसाधारण सभेत मंजूर केला. शहराच्या हितासाठी निधीचा पहिला हप्ता २६ मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थितीत भरला जावा, असे कडक निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सभेच्या सुरुवातीला स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रकल्पाचे सादरीकरण केले, तेव्हा सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. केंद्र सरकारला दिलेला प्रस्ताव आणि पालिकेला दिली जाणारी माहिती यात तफावत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. स्मार्ट सिटी प्रशासन चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याची टीका करत, प्रकल्प अंमलबजावणीत पारदर्शकता हवी, अशी आग्रही मागणी सदस्यांनी लावून धरली.

सत्ताधारी सदस्य संदीप जीरग्याळ यांनी प्रशासनाला धारेवर धरत, यापूर्वीच्या ७.५ कोटी रुपयांच्या निधीचे नक्की काय झाले? असा सवाल उपस्थित केला. “शहराचा फायदा व्हायला हवा, पण कोणतीही चूक होता कामा नये,” असे त्यांनी बजावून सांगितले.

 belgaum

यावर सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी ‘सिटीस २.०’ योजनेचे समर्थन करतानाच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “सिटीस २.० योजनेमुळे बेळगावच्या जनतेला भविष्यात मोठा फायदा होणार आहे, यात शंका नाही. शहराच्या हितासाठी महापालिका २० टक्के निधी देण्यास तयार आहे, पण स्मार्ट सिटी प्रशासनाने सदस्यांना अंधारात ठेवू नये.

या योजनेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र आणि विशेष बैठक तातडीने बोलावण्यात यावी, जेणेकरून प्रत्येक तांत्रिक बाब स्पष्ट होईल.” कोंगाळी यांनी पुढे असेही नमूद केले की, महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या कामात पूर्ण समन्वय ठेवावा, जेणेकरून जनतेचा पैसा योग्य ठिकाणी खर्च होईल.

चर्चेला उत्तर देताना महापौर मंगेश पवार म्हणाले की, “शहराच्या विकासासाठी महापालिका पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे, म्हणूनच आम्ही २० टक्के निधी देण्याचा ठराव मंजूर करत आहोत. मात्र, स्मार्ट सिटी विभागाने न्यायालयातील प्रकरणांकडे आणि तांत्रिक बाबींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”

या निर्णयामुळे ‘सिटीस २.०’ अंतर्गत होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना आता गती मिळणार असून बेळगावच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.