बेळगाव लाईव्ह :चलवेनहट्टी (ता. जि. बेळगाव) येथील गुड्डादेवी मंदिर परिसरातील एका शेतातील झोपडी अज्ञातांनी पेटवून दिल्यामुळे शेतीची औजारे व इतर साहित्यासह संपूर्ण झोपडी जळून भस्मसात होण्याबरोबरच जवळची काजूची झाडे जळाल्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
आगीच्या या घटनेस काजूच्या बागेत रंगीतपार्ट्या करणारे तळीराम जबाबदार असल्याचा आरोप केला जात असून पोलिसांनी या दारुड्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
चलवेनहट्टी येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांच्या शेतात असलेल्या झोपडीला काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताकडून आग लावण्यात आली. सदर झोपडीचा वापर शेतीची औजारे व इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता.
आगीमध्ये झोपडीसह आतील शेती विषयक साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच झोपडीला लागलेल्या आगीत आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काजूची झाडे मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून बरीच छोटी रोपं देखील जळाली आहेत. आगीच्या या घटनेमुळे चलवेनहट्टीचे शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांचे हजारो रुपयांचे नुकसान तर झालेच आहे, त्याशिवाय काजूची झाडे जळाल्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे.

गुड्डादेवी मंदिर परिसरात असलेल्या काजूच्या बागांमध्ये बाहेरील युवकांकडून मांसाहारी रंगीतपार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. पार्टीत दारु पिऊन भांडणं-तंटे करुन बाटल्या फोडणे, सिगारेट पिणे असे प्रकार तळीराम युवकांकडून सतत होत असतात.
नशेत तर्रर्र असलेल्या युवकांकडून सिगारेट ओढलेली जळती थोटके कुठेही फेकली जात असल्यामुळे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागातील पार्ट्यांचे आयोजन करणारे हुल्लडबाज युवक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे. तरी पोलिस प्रशासनाने या भागात गस्त वाढवून तळीरामांच्या उपद्रवास तात्काळ आळा घालावा, अशी जोरदार मागणी चलवेनहट्टी, अगसगे अतिवाड व बेकीनकेरी ग्रामस्थांकडून केली जात आहे.





