belgaum

चचडी गावातील सरकारी दारू दुकान बंद करण्याची डीसींकडे मागणी

0
285
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पुरुष मंडळी दारूच्या आहारी जाण्याबरोबरच दररोज कोठे ना कोठे होणाऱ्या भांडण -तंट्यांमुळे गावाची शांतता बिघडत आहे. तेंव्हा आमच्या गावातील सरकारी एमएसआयएल दारू दुकान तात्काळ बंद करावे, अशी मागणी चचडी (ता. सौंदत्ती जि. बेळगाव) गावातील नागरिकांनी विशेष करून महिलावर्गाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

चचडी येथील नागरिक आणि मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.

बागलकोट जिल्हा राज्य महामार्गा शेजारी सौंदत्ती तालुक्यातील चचडी या गावाचा चारित्र्यसंपन्न गाव असा इतिहास आहे. या गावांमध्ये सर्व जाती -धर्माचे लोक गुणागोविंदाने राहतात. तथापि कांही वर्षांपूर्वी गावाच्या क्रॉसवर सरकारी एमएसआयएल दारूचे दुकान सुरू करण्यात आले आहे. यामुळे गावामध्ये दारुड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दररोज कोठे ना कोठे भांडण तंटे सुरू असतात यामुळे गावाची शांतता भंग होत आहे.

 belgaum

बरीच पुरुष मंडळी कामधंदे सोडून दारूच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊन त्यांच्या अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत आहे चचडी गावामध्ये शाळा महाविद्यालयांना जाणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर गावातील दारूचे दुकान आणि दारुड्यांमुळे अनिष्ट परिणाम होत असून युवा पिढी देखील व्यसनाधीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद असून एकंदर संबंधित दारू दुकानामुळे संपूर्ण गावाचे स्वास्थ्य आणि शांतता बिघडली असल्यामुळे ते दारू दुकान ताबडतोब बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी नागराज देसाई, बसवराज तिगडी, राजू पाटील इराप्पा एकुंडी आदींसह मोठ्या संख्येने महिला व गावकरी उपस्थित होते. निवेदनाची प्रत बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील सादर करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.