‘बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीला गेलेले तब्बल ५१ मोबाईल शोधून काढले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी आज एका विशेष कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सोपवले. सायबर पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीमुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
बेळगाव जिल्ह्यातून विशेषतः जत्रा, सार्वजनिक उत्सव आणि बसस्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणांहून अनेक मोबाईल चोरीला गेले होते. अथणी, रामदुर्ग आणि बैलहोंगल भागातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलवर आपल्या तक्रारी नोंदवल्या होत्या.
सायबर पोलिसांनी या तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर केला. चोरीच्या मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकताच पोलिसांना तात्काळ सिग्नल मिळाला आणि त्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून ५१ मोबाईल जप्त केले.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना एसपी के. रामराजन यांनी सांगितले की, जिल्ह्यात आतापर्यंत मोबाईल हरवल्याच्या एकूण ४,७४४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सायबर सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आतापर्यंत एकूण १,०५१ मोबाईल संच शोधून ते मालकांना परत करण्यात आले आहेत. आज वितरित करण्यात आलेल्या ५१ मोबाईलमध्ये साध्या की-पॅड फोनपासून ते महागड्या स्मार्टफोनचा समावेश आहे.
मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास घाबरून न जाता तातडीने ‘सीईआयआर’ पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसपींनी केले आहे. या पोर्टलमुळे मोबाईल ट्रॅक करणे सोपे होते आणि तो ब्लॉक केल्यामुळे चोरट्यांना त्याचा गैरवापर करता येत नाही. तंत्रज्ञानाचा हा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.





