बेळगाव लाईव्ह : जन्मापासून दृष्टिहीन असूनही केवळ जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर बेळगाव महापालिकेचे कर्मचारी सुमित मनोहर मोतेकर यांनी केएएस परीक्षेत यश मिळवले आहे. राज्यात आठवा क्रमांक पटकावून त्यांनी शारीरिक अडचणींवर मात करत एक नवा इतिहास रचला आहे.
मूळचे गोकाक येथील असलेले सुमित मोतेकर सध्या बेळगाव महापालिकेत वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावत आहेत. २०२१ मध्ये पालिकेत रुजू झाल्यापासून नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी केएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. डोळ्यांनी पाहता येत नसले तरी त्यांनी कधीही हार मानली नाही.
सुमित यांच्या अभ्यासाचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. दिवसा महापालिकेचे काम आणि रात्री अभ्यासाचे नियोजन त्यांनी केले होते. वाचनासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच ‘स्पीकिंग लॅपटॉप’चा प्रभावी वापर केला. या उपकरणाच्या माध्यमातून पुस्तके ऐकून आणि टिपणे काढून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण केली.

तंत्रज्ञानामुळे आजच्या काळात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अशी प्रतिक्रिया सुमित मोतेकर यांनी दिली. केवळ कठोर परिश्रम आणि सातत्य असल्यास अंधत्व हे ध्येयप्राप्तीत कधीही अडथळा ठरू शकत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केएएस किंवा आयएएस सारख्या परीक्षा जिद्दीच्या जोरावर यशस्वी करता येतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सुमित यांच्या यशाबद्दल बोलताना सहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांनी आनंद व्यक्त केला. दृष्टी नसतानाही सुमित यांनी प्रथम महापालिकेत पद मिळवले आणि आता थेट केएएस परीक्षेत राज्यातून आठवा क्रमांक मिळवून सर्वांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे, अशी भावना हनुमंत कलादगी यांनी व्यक्त केली.
सुमित यांच्या या यशाची बातमी समजताच बेळगाव महापालिका आणि परिसरात जल्लोष करण्यात आला. सहकाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, सुमित मोतेकर यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.





