बेळगाव लाईव्ह :मुस्लिम बांधवांच्या रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात लावण्यात आलेले अयातुल्ला खामेनेई यांचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट्स तात्काळ हटवावेत. अन्यथा त्यासाठी तीव्र आंदोलन छेडून श्रीराम सेनेलाच पुढाकार घ्यावा लागेल, असा इशारा श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे.
रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात लावण्यात आलेले अयातुल्ला खामेनेई यांचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट्स तात्काळ हटवावेत, त्या मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तांना सादर करण्यासाठी आले असता ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. मुतालिक म्हणाले की, बेळगाव शहरातील मुसलमान समाज त्यांचा रमजान सण साजरा करत आहे.
मात्र हा सण साजरा करताना शहरात ठीकठिकाणी अमेरिका -इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात ठार झालेला इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई याचे पोस्टर, बॅनर, कटआउट्स लावण्यात आले आहेत. खामेनेई हा देशद्रोही, राक्षस क्रूरकर्मा होता. या खेरीज तो आपल्या देशाशी कांही संबंध नसलेला भारताला विरोध करणारा व्यक्ती होता.
काश्मीर मधील 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर खामेनेई मुसलमानांच्या बाजूने भारताच्या विरोधात उभा होता. भारताविरुद्ध अतिशय क्रूरपणे वागलेल्या अशा या देशद्रोही खामेनेईचे बेळगावमध्ये उदात्तीकरण केले जात आहे, त्याचा जयजयकार करण्यात येत आहे. त्याचे छायाचित्र लावून मिरवणुका काढल्या जात आहेत. या सर्व गोष्टी देशद्रोही कृत्यासमान असून याचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले खामेनेईचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट्स तात्काळ हटवावेत.
त्याचप्रमाणे ज्यांनी कोणी ते लावले त्यांच्यावर कारवाई केली जावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा. या पद्धतीची कृत्य आपल्या देशासाठी अपायकारक आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त अद्यापही याबाबतीत का गप्प का बसले आहेत? हे चुकीचे आहे.

आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पोट फाडून वध केल्याचे छायाचित्र लावले तर प्रशासन ते त्वरित काढून टाकते. अफजलखानाचा वध हा तर एक इतिहास आहे, मात्र अयातुल्ला खामेनेईचे छायाचित्र लावणे हा देशद्रोह असून हे कसे खपवून घेतले जाते? तेंव्हा शहरात लावलेले त्याचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट्स तात्काळ काढून टाकण्यात यावेत.
अन्यथा आम्ही श्रीराम सेना संघटना आणि अन्य हिंदू संघटना आंदोलन छेडू आम्हीच ते पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट्स काढून टाकू, मग त्यावेळी अशांतता निर्माण झाली तरी चालेल असा इशारा देऊन देशद्रोही कृत्य आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी स्पष्ट केले. पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी मुतालिक यांनी सादर केलेले निवेदन पोलीस आयुक्तांच्या गैरहजेरीत त्यांच्या सहाय्यकांनी स्वीकारले. निवेदन सादर करतेवेळी श्रीराम सेनेचे स्थानिक नेते रवी कोकितकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.





