बेळगाव लाईव्ह : होळी उत्सवाच्या पूर्वतयारीत आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यातील विजयाचा आनंद साजरा करताना बेळगावच्या भारतनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
‘भारतनगरचा लंबोदर’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता शिवा नारायण लोहार फटाक्यांच्या आतषबाजीत गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत.
सध्या त्याच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवा नारायण लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली, शहापूर) हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून भारतनगरमधील सर्व सार्वजनिक कार्यात हिरहिरीने सहभागी व्हायचा. होळीच्या पूर्वतयारीसाठी तो आपल्या सहकाऱ्यांसोबत एकत्र आला होता.
भारत आणि वेस्ट इंडिजमधील सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर उत्साहाच्या भरात फटाके वाजवत असताना सुतळी बाँबचा स्फोट झाला आणि शिवाच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली.

या अपघातात शिवाचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डावा डोळा वाचवण्यासाठी तातडीने मोठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. आतापर्यंत झालेला ३० ते ४० हजार रुपयांचा प्राथमिक खर्च मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक मदतीतून केला आहे. मात्र, पुढील उपचारांसाठी आणि डोळा प्रत्यारोपणासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने कार्यकर्त्यांनी मदतीसाठी साकडे घातले आहे.
शिवा लोहारची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. १० बाय १५ फुटांच्या छोट्या कौलारू घरात तो आपल्या वृद्ध आईसोबत राहतो. घरात तो एकटाच कमावता पुरुष असून चिकन दुकान आणि रिक्षा चालवून आपल्या आईचा सांभाळ करत असे. त्याच्या दोन बहिणी विवाहित असून त्या सासरी राहतात.
आता शिवाच्या जीवनात अंधार दाटल्याने वृद्ध आईचा सांभाळ कसा होणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर तरुणाच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी या संकटकाळात सढळ हाताने मदत करावी, अशी विनंती लंबोदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.





