बेळगाव लाईव्ह :बेक्कीनकेरी (ता. जि. बेळगाव) येथील श्री नागनाथ देवस्थान समितीच्या नावाने असलेल्या आर.एस. क्र. 49 मधील आमच्या जमिनीचे आणि आमच्या जीवांचे गावातील लक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि सदस्य मंडळाच्या हातून रक्षण करावे, अशी मागणी गेली अनेक दशके संबंधित जमीन कसणाऱ्या शेतकरी कुटुंबांनी जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
बेक्कीनकेरी (ता. जि. बेळगाव) येथील श्री नागनाथ देवस्थान समितीच्या नावे असलेली जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांपैकी गणेश विठ्ठल कडोलकर, शट्टू लक्ष्मण सावंत, प्रियांका पुंडलिक सामंत आणि उमक्का सत्तू सावंत या शेतकऱ्यांना एका टोळक्याकडून घरात घुसून निर्दयी मारहाण करण्यात आल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली आहे.
त्यामुळे सदर जमीन कसणाऱ्या सर्व शेतकरी कुटुंबांनी संतप्त होऊन जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस आयुक्तालय गाठून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना सादर केले. तत्पूर्वी शेतकरी नेते प्रकाश नायक यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयांसमोर जोरदार निदर्शने केली.
शेतकऱ्यांना संरक्षण न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी लोकप्रतिनिधींचा धिक्कार असो, गुंडगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा अधिकार असो, गुंडांना आश्रय देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा धिक्कार असो, अशा घोषणा देऊन यावेळी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
श्री नागनाथ देवस्थान समिती बेक्कीनकेरी ही सक्षम अधिकाऱ्यांव्दारे नोंदणीकृत आहे. सदर देवस्थान आर.एस. क्र. 49 मध्ये असून ज्याचे क्षेत्रफळ 2 एकर 33 गुंठे इतके आहे. सदर सर्व्हे क्रमांकात मरगाई देवस्थान म्हणून ओळखले जाणारे आणखी एक मंदिर आहे. आम्ही सर्वजण गेल्या 150 वर्षांपासून आजतागायत सदर जमिनीचा वापर करत आहोत. ज्यामध्ये दैनंदिन शेतकामासह बाजूच्या श्री नागनाथ देवस्थान आणि मंदिर मरगाई देवस्थानमधील पूजाअर्चा यांचा समावेश आहे.
एकंदर जमिनीचे आणि देवस्थानचे सर्व व्यवहार आम्ही पाहत आहोत. ही वस्तुस्थिती असल्यामुळे लक्ष्मी देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी यात्रेकरिता जागा वापरण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्यांना गेल्या दि. 3 ते 11 फेब्रुवारी 2020 पर्यंत फक्त 9 दिवसांच्या कालावधीसाठी जमीन वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेत लक्ष्मी देवस्थान समितीने आमच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे आणि बेकायदेशीरपणे सिमेंटचे खांब, सिमेंटच्या भिंतीचे कंपाउंड इत्यादी उभारण्यास सुरुवात केली आहे. केवळ आमच्या मालमत्तेचे नुकसान करणे आम्हाला त्रास देणे हा यामागचा उद्देश आहे. या संदर्भात आम्ही श्री नागनाथ देवस्थान समितीने काकती पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती.

परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. परिणामी लक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत नागो सावंत, नारायण गुंडू भडांगे, गंगाराम लक्ष्मण पाटील, मोहन पवार, अरुण नागोजी गावडे, महादेव गंगाराम भडांगे, सोमनाथ मल्लप्पा भडांगे, गजानन अप्पाजी भोगन, नारायण पुंडलिक भोगन, भरमा मारुती खादरवाडकर, नागोजी भावकू धायगोंडे आणि लक्ष्मी देवस्थान समितीच्या सदस्य मंडळातील इतर सदस्यांच्या हातून आमची मालमत्ता असलेल्या जमिनीला आणि आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
सदर श्री नागनाथ देवस्थान समिती आणि तिचे शेतकरी शट्टू रामा कोळी, मस्नु रेमन्ना डोंगळे, अप्पू सतपा सावंत, शट्टू मल्लू सावंत, लक्ष्मण रामू सावंत, गणेश सत्तू सावंत, जयपा लक्ष्मण भोगन, नागो हरी सावंत, रामू सावंत, इराप्पा धनू भडांगे हे अनेक वर्षांपासून आजपर्यंत सदर जमीन कसत असून संबंधित आणि सक्षम अधिकाऱ्यांना कर, उपकर इत्यादी भरत आहेत. बेक्कीनकेरी येथील आमच्या श्री नागनाथ देवस्थान समिती, मंदिर मरगाई देवस्थान यांच्या संदर्भात कागदोपत्री पुराव्यांनुसार आमचा कायदेशीर अधिकार आहे.
तथापि सध्या आमची जमीन आणि आमचे जीवन सदर लक्ष्मी देवस्थान समितीच्या अध्यक्षांच्या हाती धोक्यात आले असून त्यांच्यावर लवकरात लवकर कायद्यानुसार कारवाई केली केली जावी अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर केल्यानंतर पुंडलिक सावंत, प्रियांका सावंत वगैरे पीडित शेतकऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली.





