बेळगाव लाईव्ह : कागवाड तालुक्यातील मूळे गावात अंधश्रद्धेमुळे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बानामतीच्या भीतीने स्वतःच्या मुलीला साखळीने बांधून अनेक वर्षे घरात कैद करून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्राय नावाच्या व्यक्तीने आपल्या बुद्धिमंद मुलीला गेल्या अनेक वर्षांपासून साखळीने बांधून ठेवले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी ही तरुणी इतरांप्रमाणे नियमितपणे कॉलेजला जात होती. मात्र, काही वेळा ती विचित्र वर्तन करत असल्याने कुटुंबीयांनी तिच्यावर बानामती झाल्याचा समज करून घेतला.
यासाठी त्यांनी एका स्वामीजींचा सल्ला घेतला. बानामती दूर करण्यासाठी लाखो रुपये खर्च येईल, असे सांगितल्याने उपचार न करता तिला घरातच कैद करून ठेवण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, “साखळी काढल्यास ती लोकांवर दगड फेकते किंवा पळून जाते,” या कारणास्तव तिला असे बांधून ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. हा अमानुष प्रकार कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पुढील तपास सुरू आहे.





