belgaum

बेळगाव जिल्ह्यात डीजेवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश

0
21
dc roshan
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक सुव्यवस्था आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात डीजे आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनीप्रणालीवर बंदी घालण्याचा कडक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे. शाब्दिक प्रदूषण (नियंत्रण व नियम) 2000 तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे.


या आदेशानुसार बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे डीजे सिस्टीम, बेस बूस्टर, मोबाईल डीजे वाहने तसेच 75 डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणारी ध्वनीवर्धक साधने वापरण्यास पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय निवासी परिसर, सायलेंट झोन तसेच रुग्णालये, शाळा, न्यायालये आणि धार्मिक स्थळांपासून 100 मीटर परिसरातही डीजे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच संपूर्ण जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत डीजे किंवा उच्च आवाजाच्या ध्वनी साधनांचा वापर करण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिरवणूक किंवा कार्यक्रम तात्काळ थांबविणे, डीजे उपकरणे जप्त करणे, आवश्यक असल्यास वीजपुरवठा खंडित करणे, जमाव पांगविणे आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

 belgaum

तसेच पुढील कार्यक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या परवानग्याही रद्द केल्या जाऊ शकतात.
दरम्यान, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणूक किंवा उत्सव आयोजित करताना अत्यावश्यक असल्यास मर्यादित आवाजाच्या ध्वनीव्यवस्थेसाठी पोलिस विभागाची पूर्वलिखित परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ध्वनी नियमांचे पालन करण्याबाबत आयोजकांना लेखी हमीपत्रही द्यावे लागणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाणार आहे.
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच पोलीस अधीक्षक, बेळगाव जिल्हा यांना देण्यात आल्या असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.