belgaum

बेळगाव एपीएमसी यार्डमध्ये भाजीपाला दरात मोठी घसरण

0
926
Apmc veg market file pic
Apmc veg market file pic
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या एपीएमसी घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संकटात सापडले असून मागणी अभावी न विकला गेलेला माल मोठ्या प्रमाणात फेकून दिला जात आहे.

बेळगाव एपीएमसी यार्डमधील घाऊक भाजीपाल्याच्या गजबजलेल्या परिसरात मुळा, टोमॅटो, गाजर, कोबी, फ्लावर आणि घेवड्याच्या शेंगांचे ढीग साचलेले दिसत असून ज्यांची उचल अखेरीस बेळगाव शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा डेपोत टाकण्यासाठी केली जात आहे. हे दृश्य सध्या बाजारावर ओढवलेल्या संकटाची तीव्रता दर्शवत आहे. मध्य-पूर्वेकडील देशांमधील सततच्या तणावामुळे आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद पडल्याने मागणीत अचानक मोठी घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारातील मोठ्या खरेदीदारांच्या गैरहजेरीमुळे भाजीपाल्याची आवक मागणीपेक्षा खूपच जास्त आहे. यात भर म्हणून बेळगावमधील मोठ्या प्रमाणातील शेतमाल बेळगाव बाजारामार्फत गोव्याला पाठवण्यात येतो. मात्र, गोव्यातील बहुतेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद असल्याने सध्या खप मोठ्या प्रमाणात घटला आहे.

एपीएमसी यार्डमधील भाजी मार्केटमधील व्यापारी परशुराम झंगरुचे यांनी “यार्डमध्ये खरेदीदार जवळजवळ नाहीतच. हॉटेल्स आणि खानावळी पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणातील मागणी नाहीशी झाली आहे. त्यामुळे शेतमाल फेकून देण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही,” असे सांगितले. सीमेपलीकडे भावात मोठी घसरण झाली आहे. एकेकाळी 50 ते 60 रुपये प्रति किलो असलेला गाजराचा दर आता 10 ते 12 रुपयांवर आला आहे. टोमॅटोचे भाव 30 ते 40 रुपयांवरून घसरून केवळ 6 ते 10 रुपये प्रति किलो झाले आहेत. पूर्वी 70 ते 80 रुपयांना विकली जाणारी हिरवी मिरची आता 35 ते 40 रुपये प्रति किलोवर आली आहे, तर 10 ते 20 रुपये दराने मिळणारी कोथिंबिरीची जुडी केवळ 3 ते 4 रुपयांना विकली जात आहे. कांदा आणि बटाटा यांसारख्या मुख्य पिकांच्या बाबतीतही हीच परिस्थिती दिसून येते. चांगल्या प्रतीच्या कांद्याला पूर्वी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता, तो आता 1000 ते 1600 रुपयांना विकला जात आहे. त्याचप्रमाणे बटाट्याचा दर 2500 रुपयांवरून सुमारे 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरला आहे. यासंदर्भात बोलताना “आमचा वाहतुकीचा खर्चही वसूल होत नाही. बियाणे, खते, मजुरी आणि सिंचनावर खर्च करून आम्हाला बदल्यात काहीच मिळत नाही,” असे कडोली गावातील त्रस्त शेतकरी, माजी सैनिक सूरज कटांबळे म्हणाले.

 belgaum

भाव तळाला पोहोचल्याने, येत्या कांही आठवड्यांत दर सुधारतील या आशेने, शेतात उभी असलेली पिके काढू नयेत, असा सल्ला व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. “शक्य असल्यास शेतकऱ्यांनी थांबावे, असे आम्ही त्यांना सांगत आहोत; आता माल आणल्यास केवळ मोठे नुकसान होईल,” असे एका व्यापाऱ्याने सांगितले. या संकटामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक झाली आहे. कारण अनेकांना कापणी आणि वाहतुकीवर झालेला खर्च वसूल करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकंदर भाजीपाल्यांची मागणी लवकरच पूर्ववत झाली नाही, तर बेळगावमधील शेतकऱ्यांना दीर्घकाळच्या नुकसानीची भीती वाटत आहे, ज्यामुळे भाजीपाला उत्पादकांसाठी हा हंगाम गेल्या कांही वर्षांतील सर्वात कठीण हंगामांपैकी एक ठरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.