बेळगाव लाईव्ह :सर्वसामान्य घरात जन्मलेली, पण स्वतःच्या कर्तृत्वाने जनमानसात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारी काही माणसे समाजात दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे अनंतराव जांगळे.
बेळगावातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व आनंदवाडी येथील रहिवासी रामचंद्र जांगळे हे अनंत जांगळे यांचे वडील. बालपणापासूनच अनंतरावांवर सामाजिक कार्याचे संस्कार झाले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अनंतरावांना नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा ध्यास होता. या ध्यास आणि जिद्दीमुळे त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायांचा अभ्यास केला. त्यातूनच त्यांना नाटक, सिनेमा आणि ऑर्केस्ट्रा या मनोरंजन क्षेत्राचा सूर गवसला. त्यांच्या ध्येयाला जिद्दीची साथ आणि अल्पावधीत मिळालेला यशाचा मार्ग यामुळे त्यांच्यातील दर्दी नाट्यकर्मी जागा झाला.
पुढील पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी मेलडी मेकर्ससह असंख्य लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केवळ बेळगावातच नव्हे, तर संपूर्ण कर्नाटक, गोवा, कोकण आणि महाराष्ट्रात आयोजित केले. नाटकांचे प्रयोग आयोजित करत असतानाच त्यांनी बेळगाव शहरातील चित्रपटगृहांमध्ये अनेक लोकप्रिय चित्रपट प्रदर्शित केले.
कर्नाटक सरकारच्या जाचक करामुळे बेळगाव सीमाभागात मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करणे अत्यंत कठीण आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. अशा परिस्थितीतही अनंतरावांनी जोखीम पत्करून सीमाभागातील नाट्यप्रेमींना निखळ मनोरंजनाचा आनंद नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून देण्याचे काम अखंडितपणे केले.
ते स्कूल ऑफ कल्चरचे संचालक होते. आपल्या माय मराठी भाषेची त्यांनी केलेली सेवा बेळगावकरांच्या सदैव स्मरणात राहील. नाटक, सिनेमा आणि ऑर्केस्ट्रा म्हटले की अनंत जांगळे असे समीकरण झाले होते. त्यातूनच त्यांना “ज्येष्ठ नाट्यकर्मी” ही उपाधी देण्यात आली होती.
ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य होते. नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे २०१८ साली मुंबई येथे आयोजित नाट्यसंमेलनात त्यांना “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मेलडी मेकर्सच्या पुणे येथे झालेल्या हिरक महोत्सवात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
नाटक आणि सिनेमा क्षेत्रात कार्य करत असतानाच बेळगावातील विविध संघटना व संस्थांच्या कार्यात ते नेहमीच अग्रेसर असत. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय संस्थेत त्यांची बिनविरोध निवड झाली होती. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी अनेक पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. सार्वजनिक वाचनालयाचे ते विद्यमान संचालक होते.
सहकार क्षेत्रात नावाजलेल्या तुकाराम सहकारी बँकेत १९९५ पासून गेली तीस वर्षे त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले.
त्यांना शेतीचीही आवड होती. देसूर येथील आपल्या शेतात ते स्वतः लक्ष घालून देखरेख करत असत. अनंतरावांना पर्यटनाचीही मोठी आवड होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक देशांचा प्रवास केला. विविध देशांना भेट देऊन तेथील चालीरीतींचा अभ्यास केला. अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान त्यांनी तेथे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला.
टोरंटो येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाट्यप्रयोगादरम्यान अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह इतर नाट्यकर्मींनी अनंत जांगळे यांच्या कार्याचे कौतुक केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. गेल्या वीस-बावीस वर्षांपासून ते या मंडळाशी निगडित होते. अनेक वर्षे उपाध्यक्ष तर काही वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या संस्थेचे सदस्य म्हणून ते पंचवीस वर्षांपासून कार्यरत होते. या संस्थेचे तीन वेळा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. जायंट्सच्या राज्य कार्यकारिणीत त्यांनी विविध महत्त्वाची पदे भूषविली. तसेच दोन वेळा जायंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.
आनंदवाडी येथील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग होता. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांच्या पत्नी अश्विनी जांगळे यांना आनंदवाडी, हिंदवाडी आणि परिसरातील नागरिकांनी बिनविरोध निवडून दिले.
हिंदवाडी येथील हिंद हाउसिंग सोसायटी आणि हिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थांशी ते निगडित होते. हिंद सोशल क्लब आणि स्पोर्ट्स क्लब या संघटनांमध्ये त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय आहे.
शहापूर स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी कार्यरत असलेल्या मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाचे ते सल्लागार होते.
अनंतरावांना त्यांच्या यशस्वी जीवनात त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी यांची खंबीर साथ लाभली. अभिजीत आणि सुशांत या आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण आणि उत्तम संस्कार दिले. आई-वडिलांच्या संस्कारांमुळे त्यांच्या दोन्ही मुलांनीही आपल्या कार्यक्षेत्रात चांगली ओळख निर्माण केली आहे. वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शांचा वारसा पुढे चालविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
अनंतराव म्हणजे नेहमी हसतमुख राहणारे, शांत व सुस्वभावी जिंदादिल व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाने बेळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या आजच्या बाराव्या दिनी त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
— परिचित





