बेळगाव लाईव्ह : महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी बेळगावमध्ये ‘अक्का पथक’ तसेच अक्का महिला हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलीस विभाग आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ६ मार्च २०२६ रोजी जिल्हा क्रमांक १/३ सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा पोलीस आयुक्त श्री. बोरसे भूषण गुलाबराव (आयपीएस) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक के. रामराजन (आयपीएस), महिला व बाल विकास विभागाचे उपसंचालक चेतनकुमार तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
‘अक्का पथक’ची स्थापना
महिलांच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी ‘अक्का पथक’ ही योजना कर्नाटक सरकारच्या महिला व बाल विकास विभाग आणि गृहमंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे.
पथकाचे प्रमुख उद्दिष्ट
अक्का पथकाचे प्रमुख उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे :
- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे, शैक्षणिक संस्था आणि ऑनलाइन माध्यमांवर महिलांवरील छेडछाड, स्टॉकिंग आणि ईव्ह-टीझिंग रोखणे
- गुप्त नजरेखाली संशयितांना ओळखून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे
- महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून तक्रार नोंदविण्यास प्रोत्साहन देणे
- पहिल्यांदाच चूक करणाऱ्यांना समुपदेशनाद्वारे सुधारण्याचा प्रयत्न करणे
- शाळा, महाविद्यालये आणि कार्यस्थळांवर जनजागृती व आत्मसंरक्षण कार्यक्रम राबविणे
जनजागृती उपक्रम
अक्का पथकाची टीम दररोज शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन पुढील विषयांवर जनजागृती करणार आहे :
- महिलांच्या सुरक्षेसंबंधी कायदे
- सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंध
- उपलब्ध सुरक्षा व्यवस्था आणि तक्रार करण्याची पद्धत
- अमली पदार्थांचे दुष्परिणाम
- मूलभूत रस्ते सुरक्षा नियम
अक्का महिला हेल्पलाईन
महिला व मुलींना तातडीने मदत मिळावी यासाठी अक्का महिला हेल्पलाईन व्हॉट्सअॅप क्रमांक 8277951185 सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर व्हॉट्सअॅप चॅट किंवा व्हिडिओ कॉलद्वारे खालील सेवा उपलब्ध असतील :
- कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन
- महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती
- मानसोपचार समुपदेशन
- सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन
- बेळगावमध्ये सुरू करण्यात आलेले अक्का पथक आणि अक्का हेल्पलाईन हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पोलीस विभागाने सांगितले.





